चोरट्यांची दिवाळी! खरेदीसाठी आलेल्या दोघांचे मोबाइल लंपास!!

खामगाव, शेगाव शहरातील घटना
 
 
File Photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सध्या तुडूंब गर्दी आहे. या गर्दीचा फायदा चोरटे घेत असल्याचे चित्र आहे. खामगावच्या बाजारात झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या व शेगावच्या बाजारात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या खिशातून चोरट्यांनी मोबाइल लंपास करण्यात आला. आज, ३ नोव्हेंबर रोजी या चोरीच्या घटना घडल्या.
 

मोतीलाल हिरालाल अग्रवाल (६१, रा. राठी प्लॉट, खामगाव) हे अग्रसेन चौकात झेंडूची फुले खरेदी करत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून मोबाइल लंपास केला. खामगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकाँ अतुल आगलावे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत जवळा पळसखेड (ता. शेगाव) येथील अनंता नामदेव उन्हाळे (४४) हे आज शेगावच्या बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी आले होते. शहरातील खरेदी विक्री ऑफिसजवळ मोटारसायकल उभी करून ते पणत्या खरेदी करण्यासाठी बसले. त्यावेळी त्यांच्या खिशातील मोबाइल चोरट्यांनी काढून लंपास केला. शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकाँ श्री. वानखेडे करत आहेत.