पहिलीशी प्यार धोका... दुसरीशी लग्न पण तिलाही धोकाच!

विवाहितेची चिखली पोलिसांत धाव!!
 
harrasment

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपूर मुख्यालयातील निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर केळवद (ता. चिखली) येथील तरुणीने गंभीर आरोप केला आहे. हा पोलीस कर्मचारी तिचा पती असून, त्‍याने लग्‍नाआधी सहकारी महिला पोलिसासोबत लग्‍नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले होते. मात्र तिला धोका देऊन त्‍याने या तरुणीसोबत लग्‍न केले. मात्र हिलाही सांसारिक सुख दिलेच नाही. उलट १० लाख रुपये मागून शारीरिक व मानसिक छळ केला. अश्लील शिविगाळ केली, असा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी पतीसह सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.


सौ. शुभांगी श्रीकांत पांढरे (रा. केळवद) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. गुन्‍हा दाखल झालेल्यांत पती श्रीकांत शांताराम पांढरे, उषा शांताराम पांढरे, संगीता समाधान पांढरे, समाधान सिताराम पांढरे, राजू सिताराम पांढरे, दिपाली विजय पाटील, विजय भगवान पाटील, किशोरी प्रदीप बोराडे, प्रदीप महादू बोराडे यांचा समावेश आहे. संशयित नागपूर, पेठ (ता. चिखली), हिवरी (ता. जामनेर जि. जळगाव) आणि गोंधनखेडा (ता. जाफराबाद जि.जालना) येथील आहेत.

तक्रारीत सौ. शुभांगीने म्‍हटले आहे, की तिचे लग्‍न ३० जून २०२० ला भोकरवाडी (ता. चिखली) येथील गणपती मंदिरावर झाले होते. मात्र लग्‍नावेळी पोलिसात नोकरी असल्याचे पतीने सांगितले होते. वास्तवात त्‍यावेळी तो निलंबित होता. ही बाब त्‍याने लपवून ठेवून फसवणूक करत लग्‍न केले होते. लग्नानंतर सोशल मीडियावर तो नवरा-बायकोचे स्‍टेटस ठेवू देत नव्हता. त्‍याचा मोबाइलही घेऊ देत नव्‍हता. १० लाख रुपये हंुड्यासाठी मागून त्‍याने व त्‍याच्‍या कुटुंबियांनी छळ सुरू केला, असे तक्रारीत म्‍हटले आहे. लग्‍नाआधी त्‍याच्‍यावर महिला पोलिसावर लग्‍नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्‍याचाराचा गुन्‍हा होता. त्‍यात त्‍याला अटकही झाली होती. तो निलंबित होता. या सर्व बाबी लपवून ठेवण्यात आल्या. या गोष्टी उघड झाल्यानंतर तिला माहेरी आणून सोडल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.