व्यापारी कमलेश पोपट यांच्या हत्‍येचे कारण ठरले ग्राहकाला शिविगाळ!

"भिकारड्या तुझी औकात नसेल तर कशाला घेतो... तिघांनी कट रचून चोरीचा बनाव करत केली निर्घृण हत्‍या!!; SP चावरिया यांच्या पत्रकार परिषदेतून उलगडले हत्‍याकांडाचे गूढ!!
 
 
file photo

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातच नव्‍हे राज्‍यभरातील व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या व्यापारी कमलेश पोपट यांच्या हत्‍याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. दस्तुरखुद्द कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी चिखलीत येऊन पत्रकार परिषद घेत या हत्‍याकांडाची तपशीलवार माहिती दिली. मारेकऱ्यांपैकी एकाचा पोपट यांच्याशी होम थिएटर खरेदीवरून वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी पोपट यांच्या थेट हत्‍येपर्यंत मारेकऱ्यांनी कट आखला. त्‍यासाठी पोपट यांच्या चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये चोरीचा बनाव केला. आज, २५ नोव्हेंबरला तिन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्‍या देऊळगाव राजा तालुक्यात आवळण्यात जिल्हा पोलिसांना यश आले. राहुल किसन जायभाये (२३, ह. मु. देऊळगाव मही, मूळ रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा), नामदेव पंढरीनाथ बोंगाणे (२०) व राहुल अशोक बनसोडे (२०, दोघे रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगाव राजा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍यासह अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे, देऊळगाव राजाचे जयवंत ठाणेदार सातव उपस्थित होते.

१६ नोव्हेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिरून दोन चोरट्यांनी चाकूने भोसकून कमलेश पोपट यांची हत्या केली होती. त्‍यांचा एक साथीदार बाहेर पाळतीवर होता. हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी ७ पथके नियुक्‍त करून तपासाला लावली. अशाच पद्धतीचा लुटमारीचा गुन्हा महिनाभरापूर्वी देऊळगाव राजा येथे घडला होता. कापड व्यवसायिक भावसार यांच्याकडील रोख रक्कम दोन चोरट्यांनी लुटली होती. त्या प्रकरणाचा समांतर तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या पथकाद्वारे सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चिखली आणि देऊळगाव राजा येथील घटनांमध्ये साम्य आढळले. दोन्ही घटनांमध्ये वेगळी -वेगळी मोटारसायकल वापरण्यात आली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये गाड्यांचे अर्धवट व अस्पष्ट नंबर दिसून येत होते. पोलिसांनी संभाव्य नंबरची यादी तयार केली. तशा नंबरची गाडी बुलडाणा- जालना या जिल्ह्यात आहे का, याचा शोध पोलीस घेत होते. तशा संशयास्पद गाडीची पासिंग पोलिसांना बुलडाणा जिल्ह्यात आढळल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. गाडीमालकाचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देऊळगाव मही येथून राहुल जायभाये व धोत्रा नंदई येथून नामदेव बोंगाणे आणि राहुल बनसोडे यांना ताब्यात घेतले. राहुल जायभाये याच्यािवरुद्ध औरंगाबादेत खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

...म्हणून घडले हत्याकांड!
राहुल किसन जायभाये हा काही महिन्यांपूर्वी आनंद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होम थिएटर खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी किंमतीवरून पोपट आणि राहुलमध्ये वाद झाला होता. भिकारड्या तुझी औकात नसेल तर कशाला घेतो... वस्तूची किंमत कशाला करतो, असे पोपट यांनी म्हटल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले. आई-वडिलांवरून शिव्या दिल्या होत्या, असेही राहुलने पोलिसांना सांगितले. शिविगाळीचा राग डोक्यात ठेवून पोपट यांना धडा शिकविण्यासाठी कट रचून तिघांनी पोपट यांची हत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. राहुलचे वडील एका महिन्यापूर्वी मयत झाले असून, जुन्या घटनेचा राग डोक्यात ठेवून त्यांना हा कायमचा धडा शिकवण्यात आल्याचे या घटनेतून दिसून आले.

एकाच आरोपीने दिली कबुली...
पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच आरोपीने खुनाची कबुली दिल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. राहुल किसन जायभाये याने खुनाची कबुली दिली असून, त्याने दोघांची नावे सांगितली आहेत.

मुद्देमाल जप्त नाही...
पोपट यांचा खून करतेवेळी आरोपींनी वापरलेली शस्‍त्रे अजून जप्त करण्यात आली नाहीत. याशिवाय आरोपींनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याची चैनसुद्धा अजून जप्त करण्यात आली नाही. पुढील तपासादरम्यान शस्‍त्र आणि मुद्देमाल जप्त करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे आहेत शिलेदार...
चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गीते, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक, देऊळगाव राजाचे ठाणेदार जयवंत सातव, चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे, सहायक पोलीस निरिक्षक प्रवीण तळी, सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ, सहायक पोलीस निरिक्षक विलास कुमार सानप,  सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम व्यवहारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौहान, सहायक फौजदार अशफाक शेख, सहायक फौजदार अकील काझी, पोहेकाँ सुधाकर काळे, पोहेकाँ शरद गिरी, पोहेकाँ निवृत्ती चेके, पोहेकाँ अताउल्ला खान, पोहेकाँ शशीकांत धारकरी, पोहेकाँ शेळके, पोहेकाँ श्रावण गोरे, नापोकाँ राजू आडवे, नापोकाँ सदानंद चाफले, नापोकाँ माधव कुटे, नापोकाँ गणेश पाटील, नापोकाँ डिगांबर कपाटे, नापोकाँ दिनेश बकाले, नापोकाँ युवराज राठोड, नापोकाँ सुनिल रिंढे, नापोकाँ कडूबा मुंढे, नापोकाँ सुनिल खरात, नापोकाँ पुरुषोत्तम आघाव, पोकाँ उमेश राजपूत, पोकाँ शिवानंद तांबेकर, नापोकाँ विजय किटे, पोकाँ सुनिल राजपूत, पोकाँ अजय इटावा, पोकाँ विजय सोनोने, पोकाँ कैलास ठोंबरे, पोकाँ पंढरीनाथ मिसाळ, पोकाँ नीलेश उर्फ राजू मोरे, पोकाँ रुपेश जोरवार, पोकाँ शिवशंकर कायंदे, नापोकाँ लक्ष्मीकांत इंगळे, मपोकाँ मंजुषा चिंचोले, मपोकाँ पंचशिला ससाणे, मनिषा मोरे, अर्चना सरदार आदी यांनी विशेष परिश्रम करून हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.