चिखलीचे राजकारण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर!, भाजपाचे वाकदकर यांच्यावर हल्ला!!

राहुल बोंद्रे आणि कुणाल बोंद्रेंनीच हल्ला घडवून आणल्याचा आरोप; दहशतीचे राजकारण खपवून घेणार नसल्याचा आ. महाले पाटील यांचा इशारा
 
 
File Photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय राड्याचे केंद्र बनलेल्या चिखलीत भाजपा कार्यकर्ते श्याम वाकदकर यांच्यावर काल, १४ ऑक्‍टोबरला सकाळी ९ च्या सुमारास चिंच परिसरात हल्लेखोरांनी हल्ला चढवत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर आज आमदार श्वेताताई महाले यांच्यासह श्याम वाकदकर व भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. राहुल बोंद्रे, अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अरुण नन्हई आणि कुणाल बोंद्रे यांनीच हल्ला घडवून आणला असून, माझ्या जिवाचे बरे वाईट झाले तर तेच जबाबदार राहतील, असा आरोप वाकदकर यांनी केला, तर दहशतीचे राजकारण खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दिला.

भाजप कार्यकर्ते श्याम वाकदकर यांच्यावर तिघांनी हल्ला चढवला. वाकदकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. ते १४ वर्षे काँग्रेस कार्यकर्ते होते. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याशी त्यांची जवळीक होती. २०१७ पासून ते भाजपात आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून धरल्यानेच बोंद्रे परिवाराकडून हल्ला करण्यात आला. माझ्याशी कुणाचेही शत्रुत्व नाही. याआधीही असा हल्ला झाला होता, असे वाकदकर म्हणाले. वाकदकर यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या, की दहशतीचे राजकारण करून लोकांना नियंत्रित करण्यात येते असे आजही काही माजी पदाधिकाऱ्यांना वाटते. २००९ ते २०१९ या कालावधीत अनेक कुटुंबांवर वैयक्तिक हल्ले करण्यात आले. एखाद्या सिनेमात खलनायक ज्या पद्धतीने आपले दहशतीचे साम्राज्य पसरवण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रकार चिखलीत होत आहे.

मी आमदार असताना हा प्रकार खपवून घेणार नाही. ज्यांनी हल्ले केले ते पकडले जातीलच. मात्र त्याचबरोबर या भाडोत्री हल्लेखोरांना ज्यांनी पाठवले त्यांनाही पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागेल. यासंदर्भात चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे अशा सूचना दिल्याचेही आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या. आमदार राहुल बोंद्रे यांचा नामोल्लेख टाळत श्वेताताई म्हणाल्या, की भारत बोंद्रे, जनुभाऊ बोंद्रेहेदेखील आमदार व माजी आमदार झाले. परंतु पदावर असताना व नसतानाही चिखली शहरात दहशत निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी बँक लुटली नाही किंवा सुतगिरणी खाल्ली नाही.

शहरातील भूखंडातील  खेळाची मैदाने व भूखंड लोकांना विकले नाहीत. पदे ही भ्रष्टाचार करण्यासाठी नसतात हे त्यांनी दाखवून दिले. परंतु त्यांच्याच नावाचा फायदा घेऊन काही लोक आमदार झाले व राजकारणात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही आ. श्वेताताई म्हणाल्या.  श्याम वाकदकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून तुमची बहीण तुमच्या पाठिशी आहे, असे श्वेताताई म्हणाल्या. यावेळी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपाचे प्रदेश कार्यकािरणी सदस्य विजय कोठारी, रामकृष्णदादा शेटे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, पंडित देशमुख, रामदास देव्हडे, सभापती विजय नकवाल ,नगरसेवक अर्चना खबुतरे, सुभाष अप्पा झगडे, नामु गुरदासानी, संजय अतार, अनुप महाजन, सागर पुरोहित उपस्थित होते.

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्याम वाकदकर यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र राहुल बोंद्रे, कुणाल बोंद्रे आणि अरुण नन्हई यांच्याविरुद्धची तक्रार पोलिसांनी स्वीकारली नाही, असा आरोप वाकदकर यांनी केला आहे.