Buldana Live Exclusive : ते वाॅर्डबॉय रिकाम्या कुप्यांत पाणी भरून रेमडेसिवीर म्‍हणून विकायचे!!; प्रशासन, मंत्र्यांनी आदेश देऊनही रिकाम्या कुप्या कर्मचाऱ्यांकडे गेल्या कशा?; रुग्‍णांच्‍या जिवाशी खेळणाऱ्या हॉस्पिटल्सची चौकशी होणार?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील दोन प्रसिद्ध हॉस्पिटलचे तीन कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे काल, 7 मे रोजी सायंकाळी समोर आले होते. त्यामुळे शहरात खळबळ उडालेली आहे. आज, 8 मे रोजी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. हे महाभाग कर्मचारी रिकाम्या बाटलीत पाणी भरून ते …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील दोन प्रसिद्ध हॉस्पिटलचे तीन कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा काळाबाजार करत असल्याचे काल, 7 मे रोजी सायंकाळी समोर आले होते. त्‍यामुळे शहरात खळबळ उडालेली आहे. आज, 8 मे रोजी या प्रकरणात आणखी एक धक्‍कादायक माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांच्‍या हवाल्याने समोर आली आहे. हे महाभाग कर्मचारी रिकाम्‍या बाटलीत पाणी भरून ते इंजेक्‍शन म्‍हणून विकत होते. हा एकप्रकारे रुग्‍णांच्‍या जिवाशीच खेळण्याचा प्रकार होता. काळ्या बाजारात मोठी रक्‍कम देऊन विकत घेतलेले इंजेक्‍शन अशा पद्धतीने रुग्‍णांच्‍या नातेवाइकांचा घात करत होते. रेमडेसिवीरच्‍या रिकाम्या कुप्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश यापूर्वीच पालकमंत्री, प्रशासनाने दिले आहेत. असे असताना वॉर्डबॉय म्‍हणून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे रिकाम्‍या कुप्या गेल्या कशा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे दोन्‍ही हॉस्पिटल्सच्‍या व्‍यवस्‍थापनाची सुद्धा या प्रकरणात चौकशी होण्याची गरज व्‍यक्‍त होत आहे.

बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, काल, 7 मे रोजी सायंकाळी दोन प्रसिद्ध हॉस्पिटलचे वॉर्डबॉय असलेले 3 कर्मचारी पकडले होते. दोघांना जांभरून रस्‍त्‍यावरून तर एकाला येळगाव फाट्यावरून ताब्‍यात घेतले होते. त्‍यांच्‍याकडून 16 इंजेक्‍शन, 7 हजार रुपये रोख, 3 मोबाइल, 2 मोटारसायकली असा एकूण 2 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला होता. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांच्‍या नेतृत्त्वात श्रीकांत जिंदमवार यांच्‍या पथकाने ही कारवाई केली. राम गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण तरमळे (रा. पिंपळगाव सराई, ता. चिखली), संजय इंगळे (रा. हतेडी, ता. बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितले, की संशयितांकडे आढळलेली इंजेक्‍शन्स नकली आहेत. ते जुन्या वापरलेल्या बाटल्‍या चोरून त्‍यात पाणी भरून इंजेक्‍शनच्‍या नावाखाली विकत होते. हा रुग्‍णांच्‍या जिवाशीच खेळण्याचा प्रकार होता.

स्‍थानिक गुन्‍हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे ही इंजेक्‍शन्स रुग्‍णांच्‍या जिवावर बेतण्याआधीच जप्‍त करण्यात आली आहेत. मात्र रिकाम्‍या कुप्या तरी या कर्मचाऱ्यांकडे गेल्या कशा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. रिकाम्‍या कुप्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची आहे. जे कर्मचारी अटक करण्यात आले आहेत, ते शहरातील प्रसिद्ध लद्धड आणि मेहेत्रे या हॉस्पिटल्सचे असल्याचे सांगण्यात आले. मग या हॉस्पिटल्‍सनी कुप्यांची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना का केल्या नाहीत, त्‍यामुळे रुग्‍णांच्‍या जिवाशी खेळण्यात त्‍यांचाही सहभाग तर नव्‍हता ना, असा प्रश्न सामान्यांकडून व्‍यक्‍त होत आहे. रेमडेसिवीर औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे. कारण रेमडेसिवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर होत होता. त्‍याच्‍या तक्रारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्‍या. त्‍यामुळे पालकमंत्र्यांनी काही निर्देश यंत्रणेला केले होते. काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई कारवाईसोबतच इंजेक्शन दिलेल्या रुग्णाचे नाव, हॉस्पिटलचे नाव आदींचे रेकॉर्ड ठेवण्याचेही निर्देशही दिले होते. या घटनेमुळे आता हे रेकॉर्डही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनो सावधान…

काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्‍शन विकत घेणाऱ्या रुग्‍णांच्‍या नातेवाइकांच्‍या डोळ्यातही अंजन घातले आहे. कारण जे इंजेक्‍शन ते विकत घेणार होते तेच त्‍यांच्‍या रुग्‍णाच्‍या जिवावर बेतणारे होते. त्‍यामुळे यापुढे नातेवाइकांनीही असे काळ्या बाजारात विकत मिळणारे इंजेक्‍शन घेऊ नये.