दोघांकडे आढळले चोरीच्या मोबाइलचे घबाड!

बुलडाणा शहर पोलिसांनी जप्त केले अडीच लाखांचे २२ मोबाइल!!
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मोबाइल चोरीच्या तपासात एका संशयिताला ताब्‍यात घेतल्यानंतर औरंगाबादहून त्‍याच्‍या साथीदारालाही पकडून आणले. दोघांकडे चोरीच्या तब्‍बल २२ मोबाइलचे घबाडच आढळले असून, तब्‍बल अडीच लाख रुपयांचे मोबाइल बुलडाणा शहर पोलिसांनी जप्त केले आहेत. आता शहरातून ज्‍यांचे ज्‍यांचे मोबाइल चोरीला गेले आहेत, त्‍यांनी शहर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

thiefs

वैभव नारायणराव अडोळे (२१, रा. येरला जि. अमरावती ह. मु. पाळणा घराजवळ छत्रपतीनगर, बुलडाणा) आणि उमर इलियास खान (२९, रा. गल्ली क्र. ४, खोली क्रमांक १, मंत्री पार्क नारेगाव, जि. औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत. दिवाळीच्या गर्दीत अनेकांचे मोबाइल चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पोलिसांनी तपासाची गती वाढवली असताना ८ नोव्हेंबरला एका घरातून १५ हजार रुपयांचा मोबाइल आणि अन्य मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात संशयित म्‍हणून वैभवला १४ नोव्हेंबरला ताब्‍यात घेतले होते. बुलडाणा शहरात १८ ठिकाणी घरातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. चोरलेले मोबाइल उमरला विकल्याचे सांगितले. तातडीने पोलिसांचे डीबी पथक औरंगाबादला रवाना झाले.

file1

१६ नोव्हेंबरला उमरच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. त्‍याला बुलडाण्यात आणल्यानंतर दोघांकडून एकूण २२ मोबाइल (किंमत २ लाख ५० हजार), ३७ सीमकार्ड (किंमत ५ हजार ५०० रुपये) व नगदी २३० रुपये असा एकूण २ लाख ५५ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलडाणा शहरातील ज्‍या नागरिकांचे घरातून मोबाइल चोरीला गेलेले आहेत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात एएसआय माधव पेटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदीप साळुंके यांच्या आदेशाने एपीआय नीलेश लोधी, एएसआय माधव पेटकर, पोहेकाँ महादेव इंगळे, लक्ष्मण कटक, सुनिल जाधव, नापोकाँ अमोल खराडे, मोहन गव्हाळे, सुनिल मौजे, पोकाँ सुभाष धनवे यांनी केली.