बाप्पा बाप्पा..! हे आमच्या बुलडाणा जिल्ह्यात चाललय काय? चालू महिन्यात जिल्ह्यात ७४ जण बेपत्ता; १८ ते ३० वयोगटातील ३७ तरुणी झाल्या गायब; काहींनी केला प्रेमविवाह,काहींचं काय झालं देव जाणो...
Sep 26, 2023, 12:58 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात चालू सप्टेंबर महिन्यात आज पर्यंत ७४ जण बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या दोनेक वर्षांपासून सातत्याने बेपत्ता होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. १ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत बेपत्ता झालेल्यांच्या आकडा चिंता वाढवणारा आहे.
१ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ७४ जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस याप्रकरणी पोलिसांनी "मिसिंग" ची नोंद केली आहे. ७४ पैकी ४४ महिला असून उर्वरित संख्या पुरुषांची आहे. यात १८ ते ३० या वयोगटातील तरुणींची संख्या ३७ तर याच वयोगटातील तरुणांची संख्या ही १३ एवढी आहे. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये काही विवाहित असले तरी बहुतांश अविवाहित आहेत.
बेपत्ता होणाऱ्यांचे काय होते?..
जिल्ह्यात चालू महिन्यात बेपत्ता होणाऱ्यांचा आकडा ७४ असला तरी हा आकडा केवळ पोलिसांत नोंद असणाऱ्यांचा आहे. तज्ञांच्या मते हा आकडा यापेक्षा दुप्पट असण्याची शक्यता आहे, कारण बहुतांश ठिकाणी बेपत्ता झाल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार दाखल होत नाही. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी किंवा मुलगा बेपत्ता झाल्यास अशा प्रकरणात पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. मात्र वयाने सज्ञान असलेली व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर अशा प्रकरणात पोलिसांना फारसे काही करता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता होणाऱ्यांमध्ये बहुतांश प्रकरणात घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे काही पळून जाऊन लग्न करतात, तर विवाहित महिला किंवा पुरुषांमध्ये अनैतिक संबंधातून पळून जाण्याच्या घटना घडतात. मात्र असे असले तरी काही प्रकरणात यापेक्षा वेगळी कारणे असतात. ज्यात घरच्यांचा राग आल्याने निघून जाणे, भांडण झाल्याने निघून जाणे, आर्थिक अडचणीतून बेपत्ता होणे अशीही कारणे असतात. याधीच्या काही प्रकरणात मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.