"तिच्या' कारनाम्याने बापलेक घायाळ!

जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना
 
मधमाशी
शेतात येत होते, अचानक त्‍यांच्‍यावर हल्ला, दीड तास झुंज, मुले मदतीला धावली... पण तेही झाले घायाळ!
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलीने ते शेतात निघाले. अचानक मध्येच त्‍यांच्‍यावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्‍यांनी दुचाकीचा वेग वाढवला. पण त्‍या काही हटल्या नाहीत. त्‍यांनी दुचाकी सोडून १ किलोमीटर धावत मालाठाणा शिवारातील वसंत उमाळे यांच्या शेतात आश्रय घेण्याचा प्रयत्‍न केला. पण तिथेही मधमाशांनी पिच्‍छा सोडला नाही. अंगावर ब्‍लँकेट गुंडाळले. पण उपयोग झाला नाही... दीड तास मधमाशांशी संघर्ष सुरू होता... अखेर मुले मदतीला धावून आली. पण त्‍यांनाही मधमाशांचा रोष सहन करावा लागला. तेही जखमी झाले. जखमी मुलांनी गंभीर जखमी वडिलांना हॉस्पिटलमध्ये आणले. अंगावर "काटे' आणणारी ही घटना जळगाव जामोद तालुक्‍यातील सावळा शिवारात १५ नोव्‍हेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
नामदेव उमाळे असे गंभीर जखमी वडिलांचे नाव असून, त्‍यांची मुले आकाश व प्रतिक हेही जखमी झाले आहेत. नामदेव उमाळे ज्‍येष्ठ पत्रकार आहेत. पीक पाहण्यासाठी शेतात मोटारसायकलीने निघाले होते. त्‍याचवेळी मधमाशांनी त्‍यांना लक्ष्य केले. दूरध्वनीवरून त्‍यांनी मुलांना घटनेची माहिती दिली. पण तोपर्यंत मधमाशांनी त्‍यांना पार घायाळ करून सोडले होते. सर्व जखमींवर जामोदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याच मधमाशांनी मालठाणा शिवारातील समाधान इंगळे यांच्‍यासह अन्य ४ ते ५ जणांनाही चावा घेऊन जखमी केल्याचे वृत्त आहे.