प्रेमविवाहामुळे तरुणावर चाकूहल्ला प्रकरण; तरुणाची प्रकृती चिंताजनक, अकोल्याला हलविले; १७ जणांविरुद्ध गुन्हा

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पळून जाऊन लग्न केल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर होऊन मर्जीने प्रेमविवाह केल्याची कबुली प्रेमीयुगुलाने दिली. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर तरुणीच्या नातेवाइकांनी तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर काल, ४ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही थरार घडला होता. प्रियकर रघू ऊर्फ अमन तिवारी हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला आधी शासकीय रुग्णालय, त्यानंतर सिल्व्हर सिटी हॉस्पिटल आणि रात्री उशिरा अकोला येथे हलविण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी रघूच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीडला १७ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीफैल भागातील रघु ऊर्फ अमन विजय तिवारी (२४) आणि  डॉली विजय जाधव (२०) हे २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉलीच्या आईने डॉली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. डॉलीचा आत्‍येभाऊ आकाश दुरंदे (२८, सतीफैल, खामगाव) याने डॉलीने घरात चोरी करून आयफोन, सोन्याची चैन लांबविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान काल, ४ जानेवारीला डॉली आणि तिचा प्रियकर रघू तिवारी हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याला हजर झाले होते.

मर्जीने पळून जाऊन लग्न केल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली. दोघे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आल्याची माहिती डॉलीच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे डॉलीच्या कुटुंबियांनी व नातेवाइकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. डॉली आणि तिचा प्रियकर दोघे रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर डॉलीच्या नातेवाइकांनी त्‍यांचा ऑटो अडवला. रघूला ऑटोतून बाहेर ओढत वाद घातला. त्यावेळी मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता.

यावेळी उडालेल्या गोंधळात गर्दीतील कुणीतरी रघूच्या पोटात चाकूने वार केले, तर एकाने रघूच्या डोक्यात लाकडी लाफ्टरने वार केला. त्यामुळे रघू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी रघूचे जसे हाल केले तसे तुझेही करू, अशी धमकीसुद्धा डॉलीच्या नातेवाइकांनी डॉलीला दिली. घटना पोलीस ठाण्यासमोरच घडल्याने पोलिसांनी तात्काळ रघू तिवारीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिल्वर सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्या त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा रघूची आई ज्योती विजय तिवारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून रवींद्र बोंद्रे, गणेश जाधव, विजय जाधव, गणेश कोमुकर, आकाश धुरंदे, रोहित धुरंदे, ओम बोर्डे, कुणाल बोंद्रे, सनी चव्हाण, अमन चव्हाण, वैभव कीर्तनकार, महादेव फंड, गोपाल जाधव व इतर ४ अशा १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज, ५ डिसेंबर रोजी गंभीर जखमी रघूचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे सतीफैल भागात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सध्यातरी रघूची प्रकृती चांगली असल्याचे कळल्यानंतर तणाव निवळला. सध्या सतीफैल भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.