अंडाआम्लेटचे पैसे मागितले, पण त्‍याला काय माहीत त्‍याच्‍यासोबत असं घडेल!

बुलडाण्यातील घटना

 
buldana ps
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंडा आम्लेट खाल्ल्यानंतर पैसे देण्याऐवजी हातगाडीवाल्याला फायटरने ढिश्यूम ढिश्यूम करत गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना बसस्‍थानकामागे काल, १ नोव्‍हेंबरला दुपारी साडेतीनच्‍या सुमारास घडली. पोलिसांनी हातगाडीचालकाच्‍या तक्रारीवरून इंदिरानगरातील ३० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सूरज गजानन वराडे (३२, रा. जुनागाव शिवाजीनगर बुलडाणा) याने या प्रकरणात तक्रार दिली. बसस्‍थानकामागे ताे अंडाभुर्जीची गाडी लावतो. काल दुपारी तीनच्‍या सुमारास त्‍याच्‍या गाडीवर विठ्ठल अशोक गायकवाड आला. त्याने अंडा आम्लेटची आॅर्डर दिली. अंडा आम्लेट खाऊन झाल्यावर सूरजने पैसे मागितले असता त्‍याने देण्यास नकार दिला. सूरजला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.

तेवढ्यावरच न थांबता त्‍याने पॅन्टच्‍या खिशातील फायटर काढून डाव्या कानावर रागाने जोरात एक- दोन वार केले. त्यामुळे सूरजच्या डाव्या कानाला मार लागून जखम झाली. विठ्ठलने हातगाडीवरील अंड्याचा ट्रे, गाडी व अंडाभुर्जी बनविण्याचे साहित्य रस्त्यावर फेकून दिले. अंडे फेकून देत नुकसान केले. जाताना गल्ल्यातील नगदी अडीच रुपये घेऊन निघून गेला. सूरजने पोलिसांत धाव घेतली असता त्‍याला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्‍णालयात पाठविण्यात आले. कानाला गंभीर मार असल्याने त्‍याला दवाखान्यात भरती करून घेण्यात आले आहे. त्‍याच्‍या तक्रारीवरून विठ्ठलविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अंमलदार पंजाबराव साखरे करत आहेत.