भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; वडील ठार, मुलगा गंभीर,नांदुरा शहरातील भीषण अपघाताने परिसरात हळहळ...

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. सुखलाल बाबुलाल जाधव (वय ४८, रा. टाकरखेड) असे मृतकाचे नाव असून वैभव (वय १३) असे जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता मोताळा रोडवरील पुंडलिक महाराज महाविद्यालयाजवळ घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, टाकरखेड येथील सुखलाल जाधव हे मुलगा वैभवसोबत पलसोडा येथून दुचाकी क्रमांक एमएच २८ एव्ही ९९५६ने नांदुरा मार्गे घरी परतत होते. मोताळा रोडवरील पुंडलिक महाराज महाविद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सुखलाल जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला, तर वैभव गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर मृतकाचे भाऊ श्यामलाल बाबुलाल जाधव (वय ५०, रा. टाकरखेड) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अप. क्र. ८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ व १२५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दीपक सोळंके करीत आहेत.