धक्कादायक! शाळेतील लोखंडी गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू ;बुलडाणा तालुक्यातील येळगावची घटना

 
gngn
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शाळेतील लोखंडी गेट अंगावर पडल्याने ७ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे आज, १६ जुलै रोजी ही धक्कादायक घटना घडली.  रोशन रमेश दुबे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो  जळगाव जमोदला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील नेमसेडी गावचा आहे. येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत तो दुसऱ्या वर्गात शिकत होता.

आज, शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर रोशन आश्रम शाळा परिसरातील मोठ्या लोखंडी गेटसोबत खेळत होता. खेळता खेळता लोखंडी गेट अचानक रोशनच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी आश्रम शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक अंकुश जाधव व राजेश राठोड यांनी रोशनला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले . मात्र डॉक्टरांनी रोशनला मृत घोषित केले. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बुलडाणा शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.