बुलडाणा लाइव्ह इफेक्ट! बुलडाण्यात दोन बोगस डॉक्टर गजाआड! ३४ हजारांची औषधे जप्त!

 
rtyghj
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यात मुन्नाभाईंचा सुळसुळाट या मथळयाखाली २७ एप्रिलला बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. खऱ्या डॉक्टरांनी जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम व्हायला आता सुरुवात  झाली आहे. बुलडाणा शहरातून दोन बोगस डॉक्टरांना आज, ४ मे रोजी गजाआड करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुलडाणा शहरातील मोठी देवी परिसरात ही कारवाई केली.  दोन्ही बोगस डॉक्टरांवर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला असून, ३४ हजारांची  औषधी जप्त करण्यात आली आहे.

 तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्याकडे याबाबत गोपनीय तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून आज सकाळी पावणेदहा वाजता पथकाने मोठी देवी परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या वेळी विनोद शर्मा (३७) व कपिलकुमार सुशीलकुमार (२३) हे दोघे खुल्या जागेवर टेबल टाकून वैद्यकीय व्यवसाय करतांना आढळून आले. पथकाने या दोघांची विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र आढळले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेले दोन्ही बोगस डॉक्टर हरियाणा राज्यातील रहिवासी आहेत.