Breaking दोन दिवसांपासून ट्रक जागेवरच उभा होता! दुर्गंधी सुटल्यावर खरे कारण आले समोर; नागपूरवरून मंबईकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा असोला फाट्यावर खून! चिखली तालुक्यातील खळबळजनक घटना

 
tfgh
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- नागपूर वरून मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या ट्रकचालकाचा असोला फाट्यावर निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज, ८ मे रोजी सकाळी समोर आली. चिखली देऊळगावराजा रोडवरील असोला फाट्याजवळ (ता. चिखली) ही घटना उघडकीस आली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार असोला फाट्यावर मुंबईचे पासिंग असलेला एक ट्रक दोन दिवसांपासून उभा होता. ट्रक नागपूर वरून मुंबईकडे जात असल्याचे कळते. ट्रकमधून दुर्गंधी सुटल्याचे कळताच अंढेरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची तपासणी केली असता केबिनमध्ये  चादरीखाली ट्रकचालकाचा मृतदेह आढळला. ट्रकचालकाची ओळख पटली असून तो उत्तर प्रदेशातील राहणारा असल्याचे कळते. दिनेश वर्मा(३५) असे खून झालेल्या ट्रकचालकाचे नाव असल्याचे कळते.

त्याच्या गळ्यावर जखमा दिसत असून ट्रक केबिन मध्ये रक्ताचे डाग दिसत असल्याचे हा खून असल्याचाच संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान ट्रकचालकाचा मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. ट्रकचालकाचा खून कुणी आणि का केला याचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून या प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान अंढेरा पोलीसांसमोर असणार आहे.