बापरे! १ कोटीचा दरोडा! संतनगरी शेगावात दरोडेखोरांचे धाडस

 
it7lit
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लहान मोठ्या चोरीच्या घटना जिल्ह्यात घडतात. मात्र आज संतनगरी शेगाव येथे एका कुलूपबंद बंगल्यातून २ सराईत दरोडेखोरांनी चक्क १ कोटी रुपयांचा मुद्देमाल पळविल्याने  पोलीसही चक्रावले.विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

शेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील मटकरी गल्ली येथील रहिवासी आनंद पालडीवाल हे १५ जानेवारीला घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरोडेखोरांनी नेमके याच कुलूपबंद घराला टारगेट केले. मुख्य दाराची कडी कोंडा व सेंटरलॉक दरोड्यांनी मोठ्या शिताफिने तोडले. बंगल्यात प्रवेश करून जवळपास एक कोटीचा सोन्या चांदीचा ऐवज लुटून नेला. १६ जानेवारीला सकाळी सदर बंगल्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना ही घटना निदर्शनास आली.

आज दुपारी आनंद पालडीवाल गावावरून परतल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डी वाय एस पी अमोल कोळी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सीसीटीव्ही तपासासाठी मदतगार ठरणार आहे. पोलिसांचा जलद गतीने तपास सुरू आहे. एक कोटीचा दरोडा पडल्याने शेगाव नगरी हादरली  आहे.