“त्‍या’ अपघातप्रकरणी नांदुऱ्याच्‍या एचडीएफसी मॅनेजरविरुद्ध गुन्‍हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर कार धडकल्यानंतर एक ठार तर चालकासह तिघे जण जखमी झाल्याची घटना खामगाव- शेगाव रस्त्यावरील सिद्धीविनायक कॉलेजजवळ काल, २० जूनला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. या अपघात प्रकरणी कारचालक आणि मालक असलेला नांदुरा येथील एचडीएफसी बँकेचा मॅनेजर संदीप विठ्ठल काळे याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर कार धडकल्यानंतर एक ठार तर चालकासह तिघे जण जखमी झाल्याची घटना खामगाव- शेगाव रस्‍त्‍यावरील सिद्धीविनायक कॉलेजजवळ काल, २० जूनला संध्याकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली होती. या अपघात प्रकरणी कारचालक आणि मालक असलेला नांदुरा येथील एचडीएफसी बँकेचा मॅनेजर संदीप विठ्ठल काळे याच्‍याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून विठ्ठल उर्फ विशाल रामकृष्ण मेहसरे (२४, रा. आनंद चौक, नांदुरा) याच्‍या मृत्‍यूस काळे हा कारणीभूत ठरला, असे आरोप मृतकाच्‍या चुलत भावाने पोलीस तक्रारीत केला आहे.

रामेश्वर श्रीकृष्ण मेहसरे (रा. संभाजीनगर वाॅर्ड क्र. ८, नांदुरा) याने या प्रकरणी तक्रार दिली आहे. मृतक विठ्ठल खासगी इलेक्‍ट्रिक फिटिंगचे काम करत असे. विठ्ठलसह शिवाजी निनाजी क्षीरसागर, प्रविण गजानन धामोडकर यांना घेऊन संदीप काळे हा त्‍याच्‍या कारने (क्र. MH 37 V1822) नांदुरा येथून शेगावला निघाले होते. खामगाव- शेगाव रोडवर सिद्धिविनायक काॅलेजजवळ कारचा अपघात झाला. यात शिवाजी, प्रविण व संदीप काळे जखमी झाले, तर मागे बसलेला विठ्ठल ठार झाला. अपघाताची माहीती मिळाल्यावर रामेश्वर मेहसरे, गणेश शेषराव धामोडकर, विनायक शंकर वाकेकर यांनी तातडीने खामगावचे सामान्य रुग्णालय गाठले. जखमींची भेट घेतल्यानंतर त्‍यांना कळाले की संदीप काळे त्याची कार भरधाव व निष्काळजीपणाने चालवत होता. त्‍यामुळेच अपघात होऊन विठ्ठलचा मृत्‍यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप काळेविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.