सेल्‍फी घेताना होमगार्ड वाण नदीत पडून गेला वाहून; वारी हनुमान येथील दुर्घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सेल्फी घेण्याच्या नादात होमगार्ड युवक वाण नदीत पडला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो वाहून गेला. ही धक्कादायक घटना वारी हनुमान वारी भैरवगड देवस्थान (ता. संग्रामपूर) येथे २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता घडली. अनिल रामकृष्ण सरोकार (२५, खांडवी, ता. जळगाव जामोद) असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. बुलडाणा- अकोला- अमरावती या …
 
सेल्‍फी घेताना होमगार्ड वाण नदीत पडून गेला वाहून; वारी हनुमान येथील दुर्घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सेल्‍फी घेण्याच्‍या नादात होमगार्ड युवक वाण नदीत पडला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो वाहून गेला. ही धक्‍कादायक घटना वारी हनुमान वारी भैरवगड देवस्थान (ता. संग्रामपूर) येथे २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता घडली.

अनिल रामकृष्ण सरोकार (२५, खांडवी, ता. जळगाव जामोद) असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. बुलडाणा- अकोला- अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील वाण धरणाच्या कुशीत वसलेले वारी हनुमान वारी भैरवगड देवस्थान पर्यटकांना सध्या भुरळ घालत आहे. हिरवागार परिसर, त्यात वाण नदीचे खळखळते पाणी मनाला शांती देऊन जाते. त्‍यामुळे भाविकांची व पर्यटकांची गर्दी होत आहे. भंडारेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील होमगार्ड असलेला २५ वर्षीय युवक अनिल रामकृष्ण सरोकार याला सेल्फीचा मोह भोवला.

वारी हनुमान मंदीर पुलाखाली सेल्फी घेण्याच्या नांदात पाय घसरून दुथडी भरून वाहणाऱ्या वाण नदीच्‍या पाण्यात तो पडला. सध्या वाण प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडल्याने नदीचा प्रवाह मोठा आहे. पाण्याचा अंदाज नसल्याने व पोहता येत नसल्याने तो वाहून गेला. खांडवी येथील युवकांनी भंडाऱ्याचे आयोजन वारी हनुमान येथे केले होते. भंडाऱ्यासाठी अनिलही आला होता. खांडवी येथील नागरिक, नातेवाइकांनी नदीकाठच्या गावांत २१ ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत त्‍याचा शोध घेतला. मात्र मिळून न आल्याने झाडेगाव येथील पट्ट्याचे पोहणाऱ्या रेस्‍क्‍यू टीमला २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता वारखेड शिवार हिवरखेड हद्दीत दानापूर नदीपात्रात मृतदेह आढळला. घरातील कर्ता होतकरू अनिलच्या मृत्यूने सरोकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. खांडवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई- वडिल, १ भाऊ असा परिवार आहे.