सभापतींच्‍या वाहनाने कट मारल्याने दुचाकी ऑटोला धडकली; 18 वर्षीय विद्यार्थी ठार, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऑटोला धडकून दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथे काल, 28 जूनच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. खामगाव पंचायत समिती सभापतींच्या वाहनाने कट मारल्याने दुचाकी ऑटोवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रोहण शिवाजी महाले (18, रा. ज्ञानगंगापूर, खामगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. रोहण त्याच्या पिपळगाव राजा येथील …
 

खामगाव ( बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऑटोला धडकून दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला. ही घटना पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथे काल, 28 जूनच्‍या सकाळी साडेदहाच्‍या सुमारास घडली. खामगाव पंचायत समिती सभापतींच्‍या वाहनाने कट मारल्याने दुचाकी ऑटोवर धडकल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. रोहण शिवाजी महाले (18, रा. ज्ञानगंगापूर, खामगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

रोहण त्याच्या पिपळगाव राजा येथील मित्रांसोबत खामगाव येथील आयटीआयमध्ये फॉर्म भरण्यासाठी आपल्या मोटरसायकलने (एमएच 28 A 1122) जात होता. पिंपळगाव राजा येथील कृष्णा पेट्रोलपंपाजवळ सभापती सौ. रेखाताई मोरे यांच्‍या शासकीय वाहनाने त्याच्या मोटरसायकलला कट मारला. त्‍यामुळे नियंत्रण सुटून तो मोटरसायकलसह समोरून येणाऱ्या ऑटोला धडकला व गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रालासुद्धा किरकोळ मार लागला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला खामगाव येथील खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की सभापती सौ. मोरे यांचे पती युवराज मोरे हे महाराष्ट्र शासनाची गाडी चालवत होते. त्यांनी या ठिकाणी न थांबता मला अर्जंट काम आहे, असे सांगून खामगावकडे निघून गेले. रोहनच्या मृत्यूला युवराज मोरे हे जबाबदार आहेत, असा आरोप रोहनच्या नातेवाईकांनी केला आहे. अपघातग्रस्त युवकाला दवाखान्यात नेण्याचे औदार्यसुद्धा सभापती पतींनी दाखवले नाही. त्‍यामुळे ज्ञानगंगापूरच्‍या नागरिकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे. युवराज मोरे यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुटुंबातील प्रवीण महाले, लक्ष्मण हेंड, संतोष महाले तसेच ज्ञानगंगापूरचे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी केली आहे. घटनास्थळी पिंपळगाव राजा पोलिस दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करून अपघातग्रस्‍त दुचाकी पोलीस स्टेशनला लावली. खामगाव शहर पोलिसांनी रोहनच्‍या मृत्‍यूची नोंद घेतली आहे.