बुलडाण्यातील गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्रयत्‍न!; “सीसीटीव्‍ही’तील चोरटे काही तासांत पोलिसांच्‍या कैदेत!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील महाराणा प्रतापनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी मंदिराचे गेटसुध्दा तोडले. आत काहीच न मिळाल्याने चोरटे निघून गेले; मात्र त्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना १ जुलैला रात्री ९ ते ३ जुलैच्या सकाळी नऊच्या दरम्यान घडली. विजय हट्टेसिंग तोमर (२५, रा. महाराणा प्रतापनगर) यांचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील महाराणा प्रतापनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्रयत्‍न झाला. चोरट्यांनी मंदिराचे गेटसुध्दा तोडले. आत काहीच न मिळाल्याने चोरटे निघून गेले; मात्र त्‍यांचा कारनामा सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे. ही घटना १ जुलैला रात्री ९ ते ३ जुलैच्या सकाळी नऊच्या दरम्यान घडली.

विजय हट्टेसिंग तोमर (२५, रा. महाराणा प्रतापनगर) यांचे घर मंदिरासमोर आहे. सकाळी दर्शन घेण्यासाठी ते गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी शहर पोलीस ठाण्याला कळवले. पोलिसांनी सीसीटीव्‍हीचे फूटेज तपासले असता चोरटे चोरीचा प्रयत्‍न करताना दिसले. पोलिसांनी लगेच त्‍यांची ओळख पटवून शोध सुरू केला. काहीच तासांत या चोरट्यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत. यात आनंद ऊर्फ सोनू दयानंद नरवाडे (३१), गजानन रूस्तम मोरे (३५, दोन्ही रा. मिलिंदनगर, बुलडाणा) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार श्री.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नामदेव खवले, एनपीसी बळीराम खडांगळे करत आहेत.