बँकेत नोकरीला लावतो म्‍हणून सहा लाखांनी गंडवले!; मेरा खुर्दच्‍या तरुणासोबत घडला प्रकार, अंढेरा पोलिसांनी आरोपी पुण्यातून आणला पकडून!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बँकेत नोकरीला लावतो असे सांगून तरुणाला सहा लाख रुपयांनी गंडवल्याची घटना मेरा खुर्द (ता. चिखली) येथे समोर आली आहे. अंढेरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणातील आरोपीला पुण्यातून पकडून आणले आहे. शुभम मनोहर पुडले (२५,रा. सिद्धविनायक कॉलनी पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी माहिती दिली, की मेरा खुर्द येथील रहिवासी संजय …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बँकेत नोकरीला लावतो असे सांगून तरुणाला सहा लाख रुपयांनी गंडवल्याची घटना मेरा खुर्द (ता. चिखली) येथे समोर आली आहे. अंढेरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणातील आरोपीला पुण्यातून पकडून आणले आहे.

शुभम मनोहर पुडले (२५,रा. सिद्धविनायक कॉलनी पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी माहिती दिली, की मेरा खुर्द येथील रहिवासी संजय कडूबा चेके यांचा मोठा मुलगा उमेशचे बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे तो नोकरचा शोध घेत होता. संजय चेके हे पुणे येथे कांदा बियाणेच्या कंपनीत कामानिमित्त गेले होते. तेथे गावाकडील ब्रह्मपुरी येथील शेतकरी दीपक बाजडसुध्दा होते. त्यांच्या ओळखीतून पुणे येथील शुभम मनोहर पुडले या तरुणासोबत चेके यांची ओळख झाली. या तरुणाने अनेक मुले नोकरीला लावले आहेत, असे बाजड यांनी संजय चेके यांना सांगितले. त्यामुळे चेके यांनी त्‍याच्‍याकडे स्वतःच्या मुलासाठी नोकरी मिळवून देण्याची गळ घातली. त्‍यावर शुभम पुडले याने बँकेत नोकरी देतो पण नगदी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. चांगली ओळख झाल्याने संजय चेके यांनी ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये प्रवीण बबन जाधव याच्याकडे दिले आणि शुभम पुडलेच्या खात्यात एक लाख रुपये बँकेमार्फत आरटीजीएस केले. मात्र त्‍यानंतर मुलाला नोकरी मिळेल ही त्‍यांची अपेक्षा फोल ठरली. बरेच दिवस शुभम त्‍यांना उडवा उडवीची उत्तरे देत राहिला.

पैसे देऊनही मुलाला नोकरी मिळाली नसल्याने फसवले गेल्याची जाणीव संजय चेके यांना झाली. त्‍यांनी अंढेरा पोलीस ठाणे गाठून शुभम पुडलेविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीवरून शुभमविरुद्ध गुन्‍हा दाखल करून पोलिसांनी त्‍याचा शोध सुरू केला होता. मात्र पोलीस कर्मचारी जेव्‍हा आरोपीला फोनवर संपर्क करत असत तेव्‍हा त्‍यांनाही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याची बोलीभाषा एेकून पोलिसांनाही शंका निर्माण झाली होती. हा प्रकार नुकतेच काही महिन्यांपूर्वी ठाणेदारपदी रूजू झालेल्या एपीआय राजवंत आठवले यांच्या कानावर घालण्यात आली. ठाणेदार श्री. आठवले यांनी तातडीने तपासचक्रे फिरवत दुय्यम ठाणेदार मोहन पाटील, पोहेकाँ निवृत्ती पोफळे, श्री. वाघमारे यांना मोबाइल लोकेशननुसार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. मोबाइल लोकेशनवरून पुणे शहरात तीन दिवस शोध घेतल्यानंतर तो सिद्धीविनायक कॉलनीत हाती लागला. त्‍याला पकडून आणून १५ जुलैला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुन्हा १६ जुलैला हजर केले असता आणखी एक दिवसाचा पोलीस कोठडी मिळाली आहे. अशा प्रकारे बेरोजगारांना गंडवणाऱ्यांची ही टोळी आहे की तो एकटाच लुबाडणूक करत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.