जिल्हा हादरला… तिबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकरी दाम्‍पत्‍याची आत्‍महत्‍या!; आणखी किती शेतकऱ्यांचे मृतदेह पाहणार? आता तरी पंचनामे करा..!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पीक उगवले नाही म्हणून विष घेतलेल्या शेतकरी दाम्पत्याचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पत्नीचा काल, ८ जुलैच्या रात्री ९ ला तर पतीचा आज, ९ जुलैच्या पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. दोघांनी ७ जुलैला रात्री ११ च्या सुमारास कारखेड (ता. चिखली) येथील घरी विष घेतले होते. शेषराव भगवान मंजुळकार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पीक उगवले नाही म्हणून विष घेतलेल्या शेतकरी दाम्‍पत्‍याचा उपचारादरम्‍यान जिल्हा सामान्य रुग्‍णालयात मृत्‍यू झाला आहे. पत्‍नीचा काल, ८ जुलैच्‍या रात्री ९ ला तर पतीचा आज, ९ जुलैच्‍या पहाटे दोनच्‍या सुमारास मृत्‍यू झाला. दोघांनी ७ जुलैला रात्री ११ च्‍या सुमारास कारखेड (ता. चिखली) येथील घरी विष घेतले होते.

शेषराव भगवान मंजुळकार (६०) व जनाबाई शेषराव मंजुळकार (५१, रा. कारखेड) अशी आत्‍महत्‍या केलेल्या दाम्‍पत्‍याची नावे आहेत. केवळ दोन एकर शेती, त्यातही पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी केली. दुसऱ्यांदा उगवलेले पिकही पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी दाम्पत्याने विष घेतले होते. त्‍यांच्‍यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल रात्री ९ ला जनाबाई यांचा मृत्यु झाला, तर मध्यरात्रीनंतर आज पहाटे दोनला शेषराव मंजुळकार यांचाही मृत्‍यू झाला. मंजुळकार यांच्याकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले व चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झाली आहेत. शेतीसोबतच दगड फोडणे व मजुरी हा त्यांचा व्यवसाय होता. तिबार पेरणीची वेळ आल्याने पती- पत्नी चिंताग्रस्त होते. पत्नीला अर्धांगवायू आजाराचाही त्रास होता. या सर्व गोष्टींचा ताण आल्यानेच या दाम्‍पत्‍याने विषारी औषध प्राशन केल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.

आता तरी पंचनामे करा…
शेतकरी दाम्‍पत्‍याच्या आत्‍महत्‍येने जिल्हा हादरला आहे. अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. त्‍यात तिबार पेरणी करायची कशी, असा प्रश्न त्‍यांच्‍यासमोर होता. आधीच कर्जबाजारी आणि त्‍यात ही परिस्‍थिती यामुळे पोटापुरतेही मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरी हवालदील आहे. या परिस्‍थितीत शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. अन्यथा अशाच घटना वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कृषी विभागाने तातडीने पंचनामे हाती घेण्याची गरज असल्याच्‍या प्रतिक्रिया उमटत आहेत.