गावगुंडाचा दाम्‍पत्‍यावर खुनी हल्ला!; लोणार तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावगुंडाने केलेल्या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना वढव (ता. लोणार) येथे २६ जुलैला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. प्रल्हाद आनंदा राजगुरू व सौ. लक्ष्मीबाई प्रल्हाद राजगुरू (दोघे रा. वढव) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना मारहाण करणाऱ्याचे नाव राहुल गोपाल वाठोरे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावगुंडाने केलेल्या मारहाणीत दाम्‍पत्‍य गंभीर जखमी झाले. सध्या त्‍यांच्‍यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना वढव (ता. लोणार) येथे २६ जुलैला सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास घडली.

प्रल्हाद आनंदा राजगुरू व सौ. लक्ष्मीबाई प्रल्हाद राजगुरू (दोघे रा. वढव) अशी जखमींची नावे आहेत. त्‍यांना मारहाण करणाऱ्याचे नाव राहुल गोपाल वाठोरे (रा.वढव) असे आहे. त्‍याच्‍याविरुद्ध लोणार पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल सर्जेराव तौर यांनी औरंगाबादला जाऊन सौ. लक्ष्मीबाईंचा जबाब नोंदवला. जबाबात म्‍हटले आहे, की प्रल्हाद राजगुरू आणि लक्ष्मीबाई यांना दोन मुले, दोन मुली असून, मुले कामधंद्यासाठी पुण्याला ७ वर्षांपासून गेलेले आहेत तर मुलींचे लग्‍न झालेले आहे. वढवला घराशेजारी राहुल गोपाल वाठोरे राहतो. तो नेहमीच दारू पिऊन या दाम्‍पत्‍याला शिव्या देतो. जीवे मारण्याची धमकी देतो.

२६ जुलैला सकाळी आठच्‍या सुमारास संध्याकाळी साडेसहाच्‍या सुमारास राहुल दारू पिऊन आला व शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तुमचा एकेकाचा काटा काढतो, असे म्‍हणून त्‍याने त्‍याच्‍या हातात असलेल्या लोखंडी पाइपने मारहाण करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीबाईंच्‍या ओरडण्यामुळे प्रल्हाद राजगुरू धावत आले. राहुलने त्‍यांनाही डोक्यावर, दोन्ही हातांवर, पाठीवर, बरगडीवर लोखंडी पाइपने मारहाण केली. त्यामुळे त्‍यांचे डोके फुटले. प्रल्‍हाद राजगुरू गंभीर जखमी होऊन कोसळले. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी वढवला जाऊन जखमी दाम्‍पत्‍याला उपचारासाठी आधी बुलडाण्याला, नंतर औरंगाबादला हलवले. सध्या या दाम्‍पत्‍यावर औरंगाबादच्‍या घाटी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जबाबावरून राहुलविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक भारत बर्डे करत आहेत.