किन्होळा येथील विवाहितेचे अपहरण करून परराज्‍यात विकले?; आईचा टाहो, चिखली पोलीस तपास सरकवेनात पुढे!!, चिखली तालुक्‍यात महिला, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे!!

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुली, महिला गायब होण्याचे सत्र कायम असतानाच धक्कादायक अशी माहिती हाती आली आहे. किन्होळा येथील गायब झालेल्या विवाहितेचे अपहरण करून परराज्यात विकल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हरवल्याची तक्रार देताना दोघांवर संशयसुद्धा तिच्या आईने व्यक्त केला आहे. मात्र 3 जूनपासून आजवर …
 

बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820 ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मुली, महिला गायब होण्याचे सत्र कायम असतानाच धक्‍कादायक अशी माहिती हाती आली आहे. किन्होळा येथील गायब झालेल्या विवाहितेचे अपहरण करून परराज्‍यात विकल्याचा संशय तिच्‍या आईने व्‍यक्‍त केला आहे. विशेष म्‍हणजे, हरवल्याची तक्रार देताना दोघांवर संशयसुद्धा तिच्या आईने व्‍यक्‍त केला आहे. मात्र 3 जूनपासून आजवर पोलिसांनी या प्रकरणात तपास पुढे सरकवलेला नाही. महिलांना फूस लावून पळवून नेत त्‍यांना परराज्‍यात विक्रीचे एखादे रॅकेट तर जिल्ह्यात सक्रीय नाही ना, असा संशय या प्रकरणानंतर व्‍यक्‍त होऊ लागला आहे. जी विवाहिता गायब झाली, तिच्‍यासोबत सहा वर्षीय मुलगी व दोन वर्षांचा मुलगाही गायब आहे. त्‍यामुळे विवाहितेचा पती हवालदील झाला असून, त्‍याने बुलडाणा लाइव्‍हकडे याबाबतची माहिती पाठवून वृत्त प्रसिद्ध करण्याची विनंती केली. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास पुढे का सरकवत नाहीत, हे मात्र आश्चर्यस्पद आहे.

किन्होळा येथील संगिता गंगाराम कांबळे या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात मुलगी सौ. सपना बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सोबत तिने दोन चिमुकल्यांनाही नेल्याचे म्‍हटले होते. सपनाचे लग्‍न 7 वर्षांपूर्वी प्रवीण बारकू सोनोने (रा. बलवाडी, ता. वरला, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याच्‍यासोबत झाले होते. प्रवीण मूळचा बुलडाणा जिल्ह्यातीच रहिवासी असून, कामानिमित्त मध्यप्रदेशात स्‍थायिक झाला आहे. सपना आणि प्रवीण यांना सहा वर्षांची मुलगी मेघना, दोन वर्षांचा मुलगा पार्थ आहे. सपना कुटुंब नियोजनाच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी किन्होळा येथे माहेरी आली होती. तिच्‍यावर शस्‍त्रक्रियाही झाली. 2 जूनला तिची आई मजुरीला गेली होती तेव्‍हा सपना मुलांसह घरीच होती. दुपारी 4 ला तिची आई परतली असता तिला सपना आणि मुले गायब दिसली. तिने आजूबाजूला चौकशी केली असता स्‍कूटीवर आलेल्या दोघांसोबत सपना चिमुकल्यांसह निघून गेल्याची माहिती मिळाली. बराच शोध घेऊनही सपना मिळून न आल्याने तिच्‍या आईने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीत तिने पेठ येथील एक महिला व तिच्‍या दहीगाव येथील मामावर संशय व्‍यक्‍त केला आहे. त्‍यांनीच फूस लावून अपहरण करून तिला परराज्‍यात विकले असावे, असा आरोप संगिता कांबळे यांनी केला असून, गैरकायदेशीर कृत्‍यात आणखी बरेच लोक सहभागी असू शकतात, अशी भीतीही व्‍यक्‍त केली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात सर्वाधिक महिला, मुली बेपत्ता झाल्याच्‍या तक्रारी
जिल्ह्यातून गेल्या महिन्यात 41 तरुणी, 19 महिला गायब झाल्या आहेत. एकट्या चिखली तालुक्‍याचा हा आकडा 7 तरुणी आणि 2 महिलांचा आहे. अन्य तालुक्‍यांच्‍या तुलनेत मिसिंगचा हा आकडा सर्वोच्‍च आहे. चालू महिन्यातही अवघ्या 11 दिवसांत जिल्ह्यातून 13 महिला, तरुणी गायब झाल्या आहेत. यात चिखली पोलीस ठाण्यात तब्‍बल 4 महिला बेपत्ता झाल्याच्‍या तक्रारी दाखल आहेत. किन्होळ्याच्‍या महिलेने केलेल्या आरोपात सत्‍यता असेल तर अत्‍यंत गंभीर बाब असून, अशाप्रकारे जिल्ह्यातून महिलांना गायब करून परराज्‍यात विकणारे रॅकेट सक्रीय असेल तर धोकादायक आहे. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या विवाहिता, मुलींचा शोध प्राधान्याने लावण्याची गरज सामान्यांतून व्यक्‍त होत आहे.

गेल्‍या तीन दिवसांत 3 महिला बेपत्ता
गेल्या तीन दिवसांत तीन महिला बेपत्ता झाल्‍या असून, आज, 11 जूनला चिखली शहरातील रामानंदनगर येथील 19 वर्षीय सौ. ज्‍योती सुरेश साळुंके, काल 10 जूनला संग्रामपूर तालुक्‍यातील पिंगळी जहाँगिर येथील सौ. मनिषा संदीप जाधव तर 9 जूनला खामगाव शहरातील गोपाळनगरातील रहिवासी अनुराधा सागर चरखे अशा 3 महिला बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी अनुक्रमे चिखली, सोनाळा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.