अवघ्या 20 वर्षांचा अट्टल दुचाकीचोरटा लोणारमध्ये गजाआड!; 11 दुचाक्या जप्त; चोरीच्या गाड्या विकत घेणारे 5 जणही बनले आरोपी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातून एक-दोन नव्हे तब्बल 11 मोटारसायकली गायब करणारा चोरटा अखेर लोणार पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर ज्यांना मोटारसायकली विकल्या त्या 5 जणांनाही पोलिसांनी पकडले आहे. सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. हरीस खान नशीर खान (20, रा. काटेनगर लोणार) असे आरोपीचे नाव असून, परिस्थिती गरीब असल्याने दुचाकी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातून एक-दोन नव्‍हे तब्‍बल 11 मोटारसायकली गायब करणारा चोरटा अखेर लोणार पोलिसांच्‍या हाती लागला आहे. त्‍याला ताब्‍यात घेतल्यानंतर ज्‍यांना मोटारसायकली विकल्या त्‍या 5 जणांनाही पोलिसांनी पकडले आहे. सर्व दुचाकी जप्‍त करण्यात आल्या आहे. हरीस खान नशीर खान (20, रा. काटेनगर लोणार) असे आरोपीचे नाव असून, परिस्‍थिती गरीब असल्याने दुचाकी चोरीचा हा गोरखधंदा त्‍याने सुरू केला होता. ही धडाकेबाज कारवाई लोणार पोलिसांनी काल, 25 मे रोजी केली.

लोणार पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे गेल्या काही दिवसांत दाखल झाले होते. शोधाशोध करूनही दुचाकी चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता. वाहन तपासणीदरम्‍यान एक 20 वर्षीय मुलगा दुचाकी घेऊन जाताना दिसला. एका गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वर्णन केलेल्या मुलासारखाच तो दिसत असल्याने पोलिसांनी त्याला थांबवून कसून चौकशी केली. त्यात त्याने 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. परिस्थिती गरीब असल्याने जुन्या दुचाकी चोरून त्या विकण्याचा धंदा करत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून व त्याने ज्यांना गाड्या विकल्या अशा लोकांकडून एकूण 11 दुचाकी (किंमत 1 लाख 15 हजार रुपये) जप्त केल्या.

अशी विकायचा चोरीची दुचाकी…
दुचाकी चोरल्यानंतर तो गाडीची नंबर प्लेट बदलायचा. एकाच मोटारसायकलचे असलेल्‍या आरसी बुकमधील चेसिसनंबर खाडाखोड करत होता. त्यानंतर आरसी बुकची कलर झेरॉक्स काढून त्यावर हाताने आरटीओ नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर लिहून लोकांना विकायचा. त्याचा हा धंदा 5 ते 6 महिन्यापासून सुरू असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे,पोहेकाँ सुरेश काळे, पोकाँ कृष्णा निकम, पोकाँ चंद्रशेखर सुरडकर, पोकाँ किशोर बोरे, पोकाँ तेजराव भोकरे यांनी पार पाडली.

चोरीचे वाहन विकत घ्याल तर खबरदार…
चोरट्याकडून चोरीचे वाहन विकत घेणाऱ्या 5 जणांनाही लोणार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या मोटारसायकल विकत घेताना नागरिकांनी जागरूकता बाळगावी. वाहन चोरी करणाऱ्यांची माहिती कळवावी. अन्यथा चोरीचे वाहन विकत घेणाऱ्यांना सुद्धा आरोपी करण्यात येईल, असा इशारा पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी दुचाकी चोरी गेलेल्या नागरिकांनी लोणार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.