जिल्ह्यात मुली-महिलांची विक्री करणारी टोळी सक्रिय?

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात मुली आणि महिलांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचा चर्चेने जोर धरला आहे. बुलडाण्यातील एका 36 वर्षीय महिलेची मध्यप्रदेशात विक्री करून तिथे तिचा विवाह लावण्यात आल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात महिला आणि मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणातील महिलेची बुलडाणा शहर पोलिसांनी सुटका …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात मुली आणि महिलांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचा चर्चेने जोर धरला आहे. बुलडाण्यातील एका 36 वर्षीय महिलेची मध्यप्रदेशात विक्री करून तिथे तिचा विवाह लावण्यात आल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात महिला आणि मुलींची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणातील महिलेची बुलडाणा शहर पोलिसांनी सुटका करत मध्यप्रदेशातील तिच्या कथित पतीसह बुलडाण्यातील 4 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात बुलडाण्यातील 3 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. आता आणखी किती मुली अशा पद्धतीने विकल्या गेल्या आहेत यादृष्टीने तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवायला सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षभरात 399 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यात 84 अल्पवयीन मुलींचा सुद्धा समावेश आहे. यातील काही मुली आणि महिला प्रियकरासोबत पळून गेलेल्या असल्या तरी त्यापैकी काहींची विक्री झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलडाण्याच्या घटनेत राजस्थानमधील एका मुकेश नावाच्या एजंटचा सुद्धा सहभाग असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या मुकेशकडूनच विवाहित महिलेला 1 लाख 20 हजार रुपयांत वर्षभरासाठी विकत घेतल्याचे मध्यप्रदेशातील तिच्या कथित पतीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस एजंटचा शोध घेत आहेत.
लॉकडाऊन काळातही बुलडाणा शहर पोलिसांनी पुण्यातून एका तरुणीची सुटका केली होती. त्या तरुणीची वेश्याव्यवसाय करण्यासाठी विक्री करण्यात आली होती. शिवाय गेल्या महिन्यात देऊळगाव राजा शहरातील तीन मुलींची गुजरात राज्यातल्या तीन मुलांना विवाहासाठी विक्री करण्यात आली होती. देऊळगाव राजा शहरातील एका महिलेने ही विक्री करून तिन्ही मुलींचा विवाह गुजरातच्या मुलांसोबत देऊळगाव राजा शहरात लावून दिला होता. दरम्यान विवाह उरकून परतत असतानाच जालना जिल्ह्यातून त्या तिन्ही मुली फरार झाला होत्या. तिन्ही मुलांनी जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात देऊळगाव राजा शहरातील त्या एजंट महिलेविरोधात फसवणुकीची तक्रार दिल्याने ही घटना उजेडात आली होती.
खेड्या पाड्यात सुद्धा होतेय मुलींची समाजमान्य विक्री
मुलींची संख्या कमी असल्याने सध्या उपवर झालेल्या मुलांना मिळणे कठीण झाले आहे. अनेक मुलांनी चाळीशी ओलांडली असली तरी मुली मिळत नसल्याने मुलीच्या पित्याला पैसे देऊन मुलगी मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलीच्या लग्नाचा खर्च झेपत नसल्याने अनेक पित्यांनी दोन ते तीन लाख रुपयांत मुली विकल्याची उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे मुलींची संख्याच कमी असल्याने समाजानेही अशा पद्धतीने होणारे विवाह स्वीकारले आहेत.