३६ तासांनंतर सापडला अक्षयचा मृतदेह!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विश्वगंगा नदीच्या पात्रात बुडालेल्या शिरसोडी (ता. नांदुरा) येथील दुर्दैवी युवकाचा मृतदेह अखेर ३६ तासांनंतर सापडला! घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अक्षय संदीप वानखेडे (१८) हा निंबोळा येथे १९ सप्टेंबरला आला होता. दरम्यान निंबोला देवी संस्थानमागे असलेल्या विश्वगंगा नदी पात्रात सायंकाळी साडेचारच्या सुमारास …
 
३६ तासांनंतर सापडला अक्षयचा मृतदेह!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विश्वगंगा नदीच्या पात्रात बुडालेल्या शिरसोडी (ता. नांदुरा) येथील दुर्दैवी युवकाचा मृतदेह अखेर ३६ तासांनंतर सापडला! घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अक्षय संदीप वानखेडे (१८) हा निंबोळा येथे १९ सप्टेंबरला आला होता. दरम्यान निंबोला देवी संस्थानमागे असलेल्या विश्वगंगा नदी पात्रात सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाय घसरल्याने त्याचा करुण अंत झाला. स्थानिक कर्मचारी व गावकऱ्यांनी त्याचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथक परिसरात दाखल झाले.

पथकातील कृष्णा जाधव, प्रवीण साखरे, राजेंद्र झाडगे, ड्रायव्हर पी. एस. खरे, महसूल विभाग तसेच पोलीस विभागातील अंमलदार तारासिंह पवार, गणेश आघाव, संतोष काकड, श्री. गिते, गुलाबसिंह राजपूत यांनी अक्षयचा अथक शोध घेतला. काल सकाळी साडेसातला सुरू झालेली ही शोध मोहीम रात्री पावणेआठपर्यंत सुरू होती. मात्र तरीही मृतदेह मिळून आला नसल्याने मृतकाचे कुटुंब, नातेवाइक, गावकरी हवालदिल झाले. दरम्यान आज २१ सप्‍टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास अक्षयचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगताना आढळला. शोध मोहिमेत अथक प्रयत्न करणाऱ्या वडनेर भोलजी पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी घटस्थळाचा पंचनामा केला.