स्वामी देवदत्त… हा कसला स्वामी अन् महाराज…एक नंबरचा भामटा!; तुमची फसवणूक झाली असेल तर ‘बुलडाणा लाइव्ह’ला कॉल करा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तो भगवे कपडे घातलेला, मृदू वाणी, चौकस नजर अन् तोंडातून वारंवार ओम नमो नारायणचा जप… त्याला पाहून, त्याचं ऐकून तुम्ही पाय धरणार हे नक्की… पण सावध असा… हा कुणी खरंच साधूमहाराज, स्वामी नसून तो एक नंबरचा भामटा आहे. तो तुमची गरज हेरेल, तुम्हाला आमीष देईल अन् तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकाल… …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तो भगवे कपडे घातलेला, मृदू वाणी, चौकस नजर अन् तोंडातून वारंवार ओम नमो नारायणचा जप… त्याला पाहून, त्याचं ऐकून तुम्ही पाय धरणार हे नक्की… पण सावध असा… हा कुणी खरंच साधूमहाराज, स्वामी नसून तो एक नंबरचा भामटा आहे. तो तुमची गरज हेरेल, तुम्हाला आमीष देईल अन् तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकाल… पण वेळीच सतर्क होऊन त्याला पोलिसांच्या हवाली करा… या नामधारी स्वामीने जिल्ह्यात केलेल्या फसवणुकीचा एक प्रकार समोर आला असून, फसवली गेलेली व्यक्ती उच्चपदस्थ असल्याने या फसवणुकीचा बोभाटा झाला नसला तरी त्यांना ज्या पद्धतीने या भामट्याने फसवले ती पद्धत बघता त्याच्या भगव्या कपड्यामागे लपलेला गुन्हेगारी चेहरा ओळखणे गरजेचे आहे. जिल्ह्यात कुणीही या बातमीत दिलेल्या छायाचित्रातील कथित स्वामीकडून फसवले गेलेले असल्यास बुलडाणा लाइव्हशी 8888010046 या नंबरवर संपर्क करा.

नक्की काय घडले…

तथाकथित स्वामी देवदत्त हा बुलडाणा जिल्ह्यातील एका संस्थेत गेला. तिथे स्वतःचा परिचय करून देत हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत संवाद साधू लागला. स्वतः अभियंता असूनही आपण जनकल्याण आणि धर्माच्या सेवेसाठी भगवे वस्त्र धारण करत स्वतःला धर्मसेवेत वाहून घेतल्याचे सांगितले. या संस्थेतील उच्च पदस्थ व्यक्तीही त्यांच्या बोलण्याला भुलली. स्वामी देवदत्तने चांगला 3-4 दिवस तिथे मुक्काम ठोकला. या काळात या उच्चपदस्थाच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण केली. त्यांच्या मुलाला लॅपटॉप देण्याचे आमिष दाखवले. आपल्याला इन्फोसीस कंपनीने काही लॅपटॉप वाटपासाठी दिले असून, त्यातील काही अजूनही पडून आहेत. ते मी तुला पाठवून देतो असे सांगितले. गरज नसतानाही स्वामीजी म्हणतात म्हणून उच्च पदस्थ व्यक्तीनेही हो म्हटले. या संस्थेत या स्वामीने भरपूर छायाचित्रण केले. तिथून गेल्यानंतर काही दिवसांनी या स्वामीजीचा उच्चपदस्थ व्यक्तीच्या मुलाला फोन आला आणि तुला लॅपटॉप कसा हवाय त्याचे विवरण पाठव, असे सांगितले. मुलाने पाठवल्यानंतर माझ्याकडे असलेला लॅपटॉप परत करून तुला हवा तसा लॅपटॉप घेऊन मी पाठवतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी आणि अन्य अतिरिक्त साहित्यासाठी 9780 रुपये टाकण्यास सांगितले. स्वामींवर विश्‍वास असल्याने मुलानेही पैसे त्यांच्या अकाऊंटला टाकले. माणूस लॅपटॉप घेऊन पाठवलाय, माणसाला क्वारंटाइन केले, आता मी घेऊन येतो, नागपूरला ये, नागपूरला आल्यावर मी एका कार्यक्रमात आहे… आणि त्यानंतर स्वामीचा मोबाइल बंद झाला तो आजतागायत बंद आहे.

असे किती लोकांना फसवले…?

हा स्वामी बोलण्यात इतका चतुर आहे की भल्याभल्यांना गळाला लावतो. त्यामुळे तो जिल्ह्यात असतानाच्या काळात आणखी कोणाला त्याने फसवले का, हे बुलडाणा लाइव्हच्या माध्यमातून समोर येईल, अशी अपेक्षा फसवले गेलेल्या उच्चपदस्थ व्यक्तीने व्यक्त करत अशा अनेक तक्रारी असेल तर सामूहिक तक्रार होऊन मोठ्या रकमेमुळे पोलिसांनाही युद्धपातळीवर त्याचा शोध घेता येईल, असे ते म्हणाले. बुलडाणा लाइव्हला कॉल करा… स्वामी देवदत्तचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी बुलडाणा लाइव्हने ही बातमी दिली असून, तो कुणाला दिसल्यास, कुणी त्याच्याकडून फसवले गेल्यास बुलडाणा लाइव्हला नक्कीच संपर्क कराः 8888010046