शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले!; देवपूर, बेलाडमध्ये रानडुकराने केले रक्‍तबंबाळ!!; वनविभागाने दखल घेण्याची गरज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या पेरणीचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात भल्या पहाटे रवाना होतात. मात्र या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असून, रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी व एक मजूर महिला असे दोघे रक्तबंबाळ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. वनविभागाने दखल घेऊन वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. देवपूरमध्ये …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सध्या पेरणीचे दिवस आहेत. त्‍यामुळे शेतकरी शेतात भल्‍या पहाटे रवाना होतात. मात्र या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असून, रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी व एक मजूर महिला असे दोघे रक्‍तबंबाळ झाले. त्‍यामुळे शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. वनविभागाने दखल घेऊन वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

देवपूरमध्ये शेतकरी गंभीर
कुत्रे मागे लागल्याने चवताळलेल्या रानडुकराने शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढविला. यात शेतकरी गंभीर झाला. ही घटना देवपूर (ता. बुलडाणा) येथे काल, 26 जूनच्‍या दुपारी दीडच्या सुमारास घडली. गंगाराम लक्ष्मण कुसळकर (32, रा. देवपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते काल दुपारी देवपूर शिवारातील त्यांच्या शेतात गेले होते. शेतातील लहान लहान दगड उचलण्याचे ते काम करत होते. त्याचवेळी कुत्रे मागे लागल्याने चवताळलेल्या रानडुकराने त्‍यांच्यावर हल्ला चढवला. रानडुकराने त्यांना दोनदा उचलून फेकले. आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले. हल्ल्यात कुसळकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्‍या उजव्या मांडीला 15 टाके पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मलकापूरमध्ये मजूर महिलेवर हल्ला
शेतातून मजुरीचे काम करून घरी परतणाऱ्या महिलेवर रानडुकराने हल्ला करत महिलेचा हात उजव्या दंडापासून तोडून टाकला. ही घटना बेलाड (ता. मलकापूर) येथे काल, 26 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. सुनीता अर्जुन संबारे (40, रा. बेलाड) या शेतातून मजुरीचे काम करून घरी परत येत होत्या. त्यावेळी शेतरस्त्यातच रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. सोबत असलेल्या इतर मजुर महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी लाठ्या काठ्या घेऊन मदतीसाठी धावून आले. त्यांनी डुकराला हाकलले. मात्र या झटापटीत डुकराने महिलेचे लचके तोडत उजवा हात दंडापासून तोडत पळ काढला. या घटनेनंतर महिलेला लगेच मलकापुरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव खानदेश येथे हलविण्यात आले आहे.