लाचखोरांची खैर नाही… आज केला मोताळ्यातील कृषी अधिकाऱ्याचा भंडाफोड!; तीन हजारांची लाच घेताना “मध्यस्‍थ’ गजाआड!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा पंचायत समितीचा कनिष्ठ कृषी अधिकारी संदीप सोपान साळवे याला लाचखोरी अखेर महागात पडलीच. शेतकऱ्याला विहिरीच्या अनुदानाचा ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी त्याने पाच हजार रुपये मागितले. पहिल्या टप्प्यात कृषी केंद्र चालकाच्या माध्यमातून तीन हजार रुपये स्वीकारले, त्याचवेळी या केंद्रचालकावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. कारवाईची कुणकुण लागताच अधिकारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळा पंचायत समितीचा कनिष्ठ कृषी अधिकारी संदीप सोपान साळवे याला लाचखोरी अखेर महागात पडलीच. शेतकऱ्याला विहिरीच्या अनुदानाचा ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी त्‍याने पाच हजार रुपये मागितले. पहिल्या टप्‍प्‍यात कृषी केंद्र चालकाच्या माध्यमातून तीन हजार रुपये स्वीकारले, त्‍याचवेळी या केंद्रचालकावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. कारवाईची कुणकुण लागताच अधिकारी साळवे फरारी झाला. ही कारवाई आज, १५ जुलैला सायंकाळी पाचच्‍या सुमारास मोताळा येथील नांदुरा रोडवरील शिवानी कृषी केंद्रात करण्यात आली. संदीप साळवे (४६) हा मूळचा अकोल्‍याचा असून, पंचायत समितीच्‍या शासकीय निवासस्थानात राहत होता. कौतिकराव माणिकराव जुनारे (४५, रा. मोताळा) या कृषी केंद्रचालकाने साळवेसाठी पैसे स्वीकारले. त्‍याचे मोताळ्यात शिवानी कृषी केंद्र आहे.

वडगाव खंडोपंत (ता. मोताळा) येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या अंत्री शेतशिवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. या मंजूर विहिरीचा ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी संदीप साळवे याने कौतिकराव जुनारे याच्या माध्यमातून शेतकऱ्याला ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेचा पहिला टप्पा म्हणून तीन हजार रुपये आज जुनारे याच्याकडे द्यायचे ठरवले होते. शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार “एसीबी’ने सायंकाळी सापळा रचला. या सापळ्यात जुनारे याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात त्‍याच्‍याच दुकानात पकडण्यात आले. लाचखोर कृषी अधिकारी साळवे फरारी झाला असून, वृत्त लिहीपर्यंत बोराखेडी पोलीस ठाण्यात त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली “एसीबी’ बुलडाणाचे उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्याम भांगे, पो.ना. मो. रिजवान, राजू क्षीरसागर, पोलीस शिपाई विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी यांनी केली.

कुणी लाचत मागत असल्यास तात्काळ करा संपर्क…
कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने एखाद्या खासगी इसमाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ०७२६२-२४२५४८
टोल फ्री क्रमांक : १०६४