लग्‍नाचे फोटो देईनात म्‍हणून हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्‍हा, जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २० हजारांपैकी केवळ दीड हजार रुपये न दिल्याने लग्नाचे फोटो देण्यास टाळाटाळ केल्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आडोळ खुर्द (ता. जळगाव जामाेद) येथे ४ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास घडली. श्रीहरी मुरलीधर बघे …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः २० हजारांपैकी केवळ दीड हजार रुपये न दिल्याने लग्‍नाचे फोटो देण्यास टाळाटाळ केल्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी दोन्‍ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना आडोळ खुर्द (ता. जळगाव जामाेद) येथे ४ जूनला रात्री साडेआठच्‍या सुमारास घडली.

श्रीहरी मुरलीधर बघे (रा. आडोळ खुर्द) याने तक्रार दिली, की त्‍याच्‍या लग्नाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग काढण्याचे काम त्‍याने गावातीलच स्वप्नील विठ्ठल सोनोने याला दिले होते. २० हजारांत सौदा झाला होता. लग्न झाल्यानंतर ११ हजार रुपये दिले. त्‍यामुळे सोनोने याने त्‍याला लग्नाची व्हिडिओ कॅसेट दिली. बाकीचे पैसे दिल्यानंतर फोटो देतो, असे ठरले होते. त्यानंतर त्याला ६ महिन्यांपूर्वी साडेसात हजार रुपये श्रीहरीने दिले. मात्र तेव्‍हापासून तो लग्नाचे फोटो आज देतो, उद्या देतो असे म्हणून टाळाटाळ करत होता. ४ जुलैला रात्री साडेआठला श्रीहरी घरामोर उभा असताना स्वप्नील व त्याचा मोठा भाऊ गोटीराम मोटारसायकलने त्‍याच्‍या घरासमोरून जात होते. तेव्हा त्‍याने स्वप्नीलला आवाज देऊन थांबवले व लग्‍नाचे फोटो का देत नाही, अशी विचारणा केली. तेव्‍हा स्‍वप्‍नीलने तुझ्याने जे होते ते करून घे, असे म्हणून शिविगाळ केली.

घरासमोरील काठी उचलून डोक्याला मारली. त्याचा भाऊ गोटीरामने सुध्दा शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून धावून आलेल्या श्रीहरीच्‍या आईला सौ. अनुसया यांनाही स्वप्नील व गोटीरामने शिविगाळ केली व लोटून दिले. स्वप्नीलचे वडील विठ्ठल यांनीही धावत येत शिविगाळ केली व माझ्या मुलांच्या नादी लागाल तर तुम्हाला जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्‍यावरून पोलिसांनी स्वप्नील, गोटीराम व त्‍यांचे वडील विठ्ठलविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. याच प्रकरणात शिवशंकर विठ्ठल सोनोने यानेही तक्रार दिली असून, त्‍याच्‍या तक्रारीवरून मुरलीधर बघे, श्रीहरी मुरलीधर बघे, सौ. अनुसया मुरलीधर बघे यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.