युवकावर प्राणघातक हल्ला, रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेल्‍या ‘सचिन’ची प्रकृती चिंताजनक!; खैरव फाट्यावरील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्षुल्लक कारणावरून चौघांनी युवकाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. सध्या या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना खैरव (ता. चिखली) फाट्यावर 21 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. सचिन सुरेश काठोळे (28, रा. खैरव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणी सचिनचा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः क्षुल्लक कारणावरून चौघांनी युवकाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. सध्या या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍याच्‍यावर औरंगाबादच्‍या खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना खैरव (ता. चिखली) फाट्यावर 21 मे रोजी रात्री आठच्‍या सुमारास घडली.

सचिन सुरेश काठोळे (28, रा. खैरव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणी सचिनचा चुलत भाऊ लक्ष्मण काठोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी कोलारा येथील सतिश सोळंकी, गोविंदा सोळंकी, देविदास सोळंकी व सागर सोळंकी यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. सोळंकी यांचे खैरव फाट्यावर रसवंतीचे दुकान आहे. सचिनने लक्ष्मण यांना मोबाइलवरून कॉल करून रसवंतीमालक विनाकारण मारहाण करत असल्याचे सांगितले. त्‍यामुळे लक्ष्मण तातडीने खैरव फाट्यावर आले. तिथे मोठी गर्दी जमली होती, तर सचिन रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला होता. आवाज देऊनही तो उठत नव्‍हता की बोलत नव्‍हता. त्याच्‍या डोक्याच्‍या समोरील भागात जबर मार लागून रक्त वाहत होते. गावातील नितीन खंडागळे, किरण कुटे, प्रकाश दशरथ कुटे यांच्‍या मदतीने त्‍याला तातडीने उचलून किरण कुटे यांच्‍या गाडीवर चिखली येथे जवंजाळ हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

किरण कुटे यांनी लक्ष्मण यांना घटनेबाबत सांगितले की, रसवंतीचालक गोविंदा सोळंकी ,देविदास सोळंकी व सतिष सोळंकी यांच्‍यासोबत काही कारणावरून सचिनचा वाद चालू होता. ते त्यास लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करत होते. तेवढ्यात रसवंतीच्‍या मागून सागर सोळंकी आला व त्याने काहीएक विचार न करता लाकडी दांडकाच्‍या सचिनच्‍या डोक्यात मारला. त्‍यानंतर सचिन जमिनीवर कोसळला. मी व नितीन खंडागळे यांनी त्यांची सोडवासोडव केली. डॉ. जवंजाळ यांनी सचिनचे सिटीस्‍कॅन करून प्राथमिक उपचार करुन डोक्याला जबर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी सचिनलाल औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला. सध्या सचिनवर औरंगाबादच्‍या खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून, चिखली पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.