पुन्‍हा सोन्याच्‍या गिन्न्या… लाखनवाडा, जयरामगड शिवारातील जंगलात कोंबिंग ऑपरेशन; 5 अट्टल गुन्‍हेगारांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या, धारदार शस्‍त्रांसह 90 हजारांचा मुद्देमाल जप्‍त

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोन्याच्या गिन्न्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून आणखी एकाला चाकूचा धाक दाखवून 10 ते 12 जणांनी लूटल्याची घटना समोर आल्याने 14 अधिकारी आणि 50 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा लाखनवाडा, जयरामगड शिवारातील जंगलात धडकला आणि कोंबिंग ऑपरेशन यशस्वी करत 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हे पाचही जण अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सोन्‍याच्‍या गिन्न्या स्वस्‍तात देण्याचे आमिष दाखवून आणखी एकाला चाकूचा धाक दाखवून 10 ते 12 जणांनी लूटल्‍याची घटना समोर आल्याने 14 अधिकारी आणि 50 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा लाखनवाडा, जयरामगड शिवारातील जंगलात धडकला आणि कोंबिंग ऑपरेशन यशस्वी करत 5 आरोपींच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. हे पाचही जण अट्टल गुन्‍हेगार आहेत. त्‍यांच्‍याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यांच्‍याकडून तलवार, चाकू, लाकडी दांडा, मोबाइल, मोटारसायकल असा जवळपास 90 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, 31 मे रोजी पहाटे करण्यात आली.

30 मे रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, एकाला सोन्याच्‍या गिन्न्या स्‍वस्‍तात देण्याचे आमिष दाखवून 3 ते 4 लाख रुपये घेऊन शिर्ला (ता. खामगाव) येथील राधास्वामी सत्‍संग मठाजवळ बोलाविण्यात आले होते. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या 10 ते 12 जणांनी चाकूचा धाक दाखवून त्‍याच्‍याकडील 25 हजार रुपये घेऊन पळ काढला होता. या गुन्ह्याच्‍या तपासात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की फरार आरोपी हे लाखनवाडा आणि जयरामगड शिवारातील जंगलात दडून बसलेले आहेत. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत (खामगाव) यांच्‍या नेतृत्त्वात 14 अधिकारी आणि 50 अंमलदारांचे पथक तयार करून जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली. मोठ्या शिताफीने 5 आरोपींच्‍या मुसक्‍या आवळण्यात आल्या.

महेश बाळू मोहिते (23, रा. दधम, ता. खामगाव), दिलीप शेषराव चव्‍हाण (23, रा. दधम), कृष्णा पुंडलिक चव्‍हाण (60, रा. दधम), बळीराम पुंडलिक चव्‍हाण (45, रा. दधम), सतीश पवन पवार (19, रा. जयरामगड, ता. खामगाव) अशी आरोपींची नावे असून, हे सारेच अट्टल गुन्‍हेगार आहेत. त्‍यांच्‍याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत यापूर्वी गंभीर स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल आहेत. ही धडाकेबाज कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शेगाव शहरचे ठाणेदार संतोष ताले, हिवरखेडचे ठाणेदार प्रवीण तळी, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी, सहायक पोलीस निरिक्षक श्री.गोंदके, गौतम इंगळे, नीलेश सरदार, पोलीस उपनिरिक्षक गौरव सराग, हरिविजय बोबडे, राहुल कातकाडे, ईश्वर सोळंके, श्री. पळसपगार, नितीन इंगोले, श्री. ब्राह्मणे यांच्‍यासह उपविभागातील अंमलदार, आरसीपी पथक यांनी केली.