झटपट श्रीमंत होण्याच्‍या नादात शेजाऱ्यानेच चिरला वृद्धेचा गळा!; दसऱ्याच्‍या आदल्या दिवशी लुटले होते तिच्या अंगावरील “सोने’!!; केळवदमधील थरारक हत्‍याकांडाचा २४ तासांत उलगडा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या राधाबाई हिवाळे (६५) या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना केळवद (ता. चिखली) येथे काल, १६ ऑक्टोबर रोजी समोर आली होती. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मारेकऱ्याचा शोध लावला असून,त्याला अटकही केली आहे. प्रकाश शेनफड हिवाळे (३३, रा. केळवद, ता. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. …
 
झटपट श्रीमंत होण्याच्‍या नादात शेजाऱ्यानेच चिरला वृद्धेचा गळा!; दसऱ्याच्‍या आदल्या दिवशी लुटले होते तिच्या अंगावरील “सोने’!!; केळवदमधील थरारक हत्‍याकांडाचा २४ तासांत उलगडा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या राधाबाई हिवाळे (६५) या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना केळवद (ता. चिखली) येथे काल, १६ ऑक्टोबर रोजी समोर आली होती. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मारेकऱ्याचा शोध लावला असून,त्याला अटकही केली आहे. प्रकाश शेनफड हिवाळे (३३, रा. केळवद, ता. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाबाई हिवाळे ही घटस्फोटीत महिला बकऱ्या चारण्याचे काम व शेती करत होती. १४ ऑक्टोबरला ती बकऱ्या चारण्यासाठी गेली. संध्याकाळी बकऱ्या परतल्या मात्र ती परतली नव्‍हती. त्यामुळे नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता. चिखली पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रारही देण्यात आली होती. काल, १६ ऑक्टोबर रोजी तिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत गावाच्या पूर्वेकडील देवी मंदिराजवळील दरीत सापडला होता. मात्र यावेळी तिच्या अंगावरील सर्वच दागिने लंपास करण्यात आलेले असल्याने दागिन्यांच्या आमिषापोटी तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली होती.

असा झाला उलगडा…
बकऱ्या चारण्यासाठी गेलेली राधाबाई १४ ऑक्टोबरला दुपारी काही शेतकऱ्यांना शेतशिवारात भेटली होती. त्यावेळी ती तिच्या शेताकडे जात असताना “पका’चा फोन आलाय, तलाठी वावरात येणार हाय… पीक पाहणी करायला म्‍हणून जाते… असे ती म्हणाली होती. मृतदेह आढळल्यानंतर गावात तशी कुजबुज सुरू होती. पोलिसांनी याबाबत तलाठ्यांना विचारणा केली असता मी तिकडे गेलोच नव्हतो, असे उत्तर दिल्याने संशयाची सुई प्रकाशकडे वळली होती. राधाबाईच्या मृतदेहाच्या शेजारी तिचा मोबाइल सापडला. मात्र त्यात सीम नव्हते. प्रकाश हिवाळे महिलेच्या शेजारीच राहतो. तिचा शोध सुरू असताना तो घरी नव्हता.

पोलिसांनी काल त्याला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली मात्र सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली केली. दागिन्यांच्या हव्यासापोटीच प्रकाशने राधाबाईचा खून केला. घटनेनंतर चाकू दरीजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात फेकून दिला. लुटलेले दागिने त्याने चिखली येथील एका सोनाराच्या दुकानात मोडले. सोनाराच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत प्रकाश कैद झाला. याशिवाय पोलिसांनी तिचा मोबाइल तपासला असता त्‍यावरही प्रकाशचे कॉल आल्याचे दिसून आले. प्रकाश हा राधाबाईचा जवळचा नातेवाइक आहे. गरिबीला कंटाळून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने राधाबाईचा खून केल्याचे समोर आले आहे.