जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ… कुठे घर, कुठे दुकान फोडले…तर कुठे मोटारसायकलीच केल्या लंपास!; जनावरेही सोडली नाहीत…!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. कुठे घर फोडण्यात आले, कुठे दुकान तर कुठे मोटारसायकलीच चोरट्यांनी लंपास केल्या. नांदुऱ्यात दुकान फोडून ५२ टायर लांबवलेएच.एम. एजन्सी हे टायर विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी ७६ हजार रुपयांचे तब्बल ५२ टायर चोरून नेले. ही घटना नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवर रेल्वेगेटच्या बाजूला काल, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. कुठे घर फोडण्यात आले, कुठे दुकान तर कुठे मोटारसायकलीच चोरट्यांनी लंपास केल्या.

नांदुऱ्यात दुकान फोडून ५२ टायर लांबवले
एच.एम. एजन्सी हे टायर विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी ७६ हजार रुपयांचे तब्‍बल ५२ टायर चोरून नेले. ही घटना नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवर रेल्‍वेगेटच्‍या बाजूला काल, ७ जुलैला सकाळी समोर आली. दुकानमालक मुजमिल मोहम्मद साजीद वडवाला (२२) याच्‍या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. मुजमिल सहा जुलैला रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेला होता. काल सकाळी साडेआठला नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेला असता कुलूप तोडलेले दिसले. त्‍याने मोहम्मद मोसीन मोहम्मद सब्बीर वडवाला, कलीम खान यांना बोलावून ही बाब सांगितली. तेव्‍हा त्‍यांनी दुकानाचे शटर उघडून पाहिले असता दुकानातील ५२ नवीन टायर गायब दिसले. त्‍याने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. घोडेस्वार करत आहेत.

सिंदखेड राजा तालुक्‍यात घरफोडी, दागिन्यांसह अडीच लाखांचा माल लंपास
सिंदखेड राजा तालुक्यातील धांदरवाडी येथे ६ जुलैला विलास संजय शिंदे यांच्या घरातील पेटीचे कुलूप तोडून नगदी दीड लाख व सोने चांदीचे दागिने असा मिळून जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. काल सकाळी हा प्रकार लक्षात येताच शिंदे यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आज ठसे तज्‍ज्ञ व श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
शिंदे यांचे सिंदखेड राजा येथे तनुजा कॉम्प्युटर व मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांनी दुकानातील वस्तूचे खरेदी- विक्रीचे पैसे व सोने-चांदीचे दागिने पेटीत ठेवले होते. चोरी झाली त्या रात्री विलास शिंदे यांचे आई-वडील कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. ७ जुलैला मोबाईल ऑर्डरचे पैसे देण्यासाठी पेटीजवळ गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. पेटीत दीड लाख रुपये रोख, दहा ग्रॅम वजनाच्या दोन बदामी अंगठया, सात ग्रॅम वजनाची एक अंगठी व बोटातील सोन्याची रिंग चांदीचे ब्रेसलेट, चांदीचा गोफ, चांदीच्या अंगठ्या असा अडीच लाख आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी टीनपत्रे उचकटून लंपास केला. तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेंदूर्जनमधून मोटारसायकलची चोरी
शेंदूर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील ज्ञानेश्वर भास्कर शिंगणे (३०) यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्‍यांचे काका दिनकर एकनाथ शिंगणे यांची मोटारसायकल (क्र. MH २८ AR७८५३) ते चालवत होते. ६ जुलैला सायंकाळी सातला त्‍यांनी मोटारसायकल त्‍यांचा भाऊ नंदकिशोर शिंगणे यांना दिली होती. त्यांनी काम आटोपून त्यांच्‍या घराजवळ ती उभी करून झोपले. ७ जुलैला सकाळी ७ वाजता झोपेतून उठून घराबाहेर आले असता त्यांना मोटारसायकल दिसली नाही. दोघांनी मिळून खूप शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. कोणीतरी मोटारसायकल चोरून नेली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

शेगावमधूनही मोटारसायकलची चोरी
श्रीराम अरुण कोकाटे (३१, रा. सरस्वती काॅलेजसमोर, पवारवाडी, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्‍यांनी जुनी वापरती मोटारसायकल सहा महिन्यांपूर्वी विकत घेतली होती. ५ जुलैला रात्री १० वाजता दूध वाटप करून घरासमोर मोटारसायकल उभी करून ठेवली होती. ६ जुलैला सकाळी ६ वाजता उठून पाहिले तर मोटारसायकल दिसली नाही. १७ हजार रुपयांची ही मोटारसायकल कुणीतरी चोरून नेली. शेगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संग्रामपूर तालुक्‍यात गोडावून फोडले
गोडावून फोडून चोरट्यांनी ३ तुरीचे पोते, १ हरभराचे पोते (दोन्‍ही मिळून किंमत १२ हजार रुपये) लंपास केले. ही घटना एकराला (ता. संग्रामपूर) येथे ६ जुलैला सकाळी समोर आली. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गजानन वसंता हागे यांनी तक्रार दिली की शेतातील तूर, हरभराचे पीक २० मार्च काढून गोडावूनमध्ये ठेवलेले होते. ६ जुलैला गोडावूनच्‍या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. गोडावूनमधील तूर आणि हरभरा चोरट्यांनी गायब केला होता.

घरासमोर बांधलेला बैल नेला चोरून
घरासमोरील वाडग्‍यात बांधलेला बैल चोरीस गेल्याची तक्रार हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील शेतकरी मुरलीधर रामभाऊ घोंगे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, ७ जुलैला केली. त्‍यांच्‍याकडे चार एकर शेती आहे. एक होंडा बैल शेती पेरणी व तयार करण्यासाठी त्‍यांच्‍याकडे होता. ६ जुलैला सायंकाळी सातच्‍या सुमारास त्‍यांनी घरासमोरील वाडग्‍यात तो बांधून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सातला बैलाचे शेण-पाणी करण्यासाठी गेले असता त्‍यांना बैल दिसला नाही. परिसरात बैलाचा शोध घेतला असता मिळून आला नाही. लाल होंडा, चेहऱ्यावर पांढरे ठिपके, शेपटीचा गोंडा काळा (किंमत अंदाजे २५ हजार रुपये) अशा वर्णनाचा बैल चोरट्याने चोरून नेला आहे, असे त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.