चक्‍क कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल देणारी टोळी!; एकास अटक, खामगावातील धक्‍कादायक प्रकार

बनावट अहवालाच्या आधारे सुटी, विम्याचा लाभ; अन्य आरोपींचा शोध सुरूबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात विविध गैरप्रकार घडल्याचे समोर येत असतानाच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात चक्क बनावट पॉझिटिव्ह अहवाल तयार करून देणाऱ्या एकास आज, 1 जूनला पहाटे अटक करण्यात आली. सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून शहर पोलिसांनी …
 
चक्‍क कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल देणारी टोळी!; एकास अटक, खामगावातील धक्‍कादायक प्रकार

बनावट अहवालाच्या आधारे सुटी, विम्याचा लाभ; अन्य आरोपींचा शोध सुरू
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात विविध गैरप्रकार घडल्याचे समोर येत असतानाच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात चक्‍क बनावट पॉझिटिव्‍ह अहवाल तयार करून देणाऱ्या एकास आज, 1 जूनला पहाटे अटक करण्यात आली. सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. त्‍यावरून शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत कंत्राटी कक्षसेवक विजय सुरेश राखोंडे याला आज, 1 जूनला अटक केली. त्‍याला या कामासाठी पैसे देणाऱ्या चंद्रकांत उमाप (रा. खामगाव) याच्‍याविरुद्धही गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा अनेकांना फटका बसला. अनेक जण या संक्रमणाने बाधित झाले. त्याचवेळी या संसर्गामुळे मिळत असलेल्या दीर्घकालीन सुटी आणि विम्याचा आर्थिक लाभ लुटण्यासाठी काहींनी प्रयत्‍न केल्‍याचे समोर आले आहे. त्यांच्या या प्रयत्‍नांना सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी आणि त्याच्या साथीदारांनी मदत केल्‍याचे समोर आले. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांचा दुसऱ्यांदा स्वॅब घेत खासगी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यातील कामगारांना पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. त्‍यांचा पॉझिटिव्‍ह अहवाल या कामगारांचा म्‍हणून दाखवण्यात येत होता. खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे यांनी शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सतर्क झालेले आरोपी फरार झाल्याचे समजते.

असे फुटले बिंग…
खामगाव येथील पारले जी कंपनीतील कर्मचारी जास्त संख्येने कोरोना तपासणीसाठी स्वॅब देण्यास येत असल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. त्‍यातील बहुतांश जण पॉझिटिव्‍ह येत असल्याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे डॉक्‍टरांनी स्‍टाफला या कंपनीतून स्वॅब देण्यासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड, आयकार्ड तपासणीच्‍या सूचना केल्या होत्या. काल, 30 जूनला सायंकाळी सातच्‍या सुमारास ड्युटीवरील डॉ. प्राची निचळ यांनी त्‍यांना माहिती दिली की, रुग्‍णालयात भरती असलेल्या चार रुग्‍णांचे पॉझिटिव्‍ह असतानाही पुन्‍हा स्‍वॅब घेण्यात आले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या नाकात दुखत आहे. डॉ. टापरे यांनी तातडीने त्‍या ठिकाणी येत सुरक्षारक्षकांना या ठिकाणी कुणी बाहेरून आले होते का याची विचारणा केली. त्‍यावर बाहेरून कुणी आले नव्‍हते. मात्र ड्युटीची वेळ नसतानाही कंत्राटी कक्षसेवक विजय सुरेश राखोंडे आला होता, असे सांगितले. राखोंडेला स्वॅब घेण्याचे अधिकार नाहीत. तरीही त्‍याने स्वॅब घेतल्याचेही समोर आले. त्‍याला स्वॅब का घेतले, याची विचारणा केली असता त्‍याने कबुल केले की, चंद्रकांत उमाप (रा. खामगाव) याने प्रत्‍येक पॉझिटिव्‍ह रुग्‍णाच्‍या बदल्यात पाच हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. उद्या तो 1 जुलैला तो चार स्वॅबचे 20 हजार रुपये देणार आहे. त्‍यामुळेच मी 4 स्वॅब काढून ठेवल्याचे त्‍याने सांगितले. यापूर्वीसुद्धा त्‍याने असेच स्वॅब काढून विकल्याचे समोर आले.