घरी परतताना वाटमारी… मारहाण करत नवीच मोटारसायकल लांबवली!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलस्वाराला काठीने मारहाण करून दुचाकी लांबवल्याची घटना देऊळगाव राजा- चिखली रोडवरील असोला फाट्याजवळ २४ जुलैच्या रात्री आठच्या सुमारास घडली. अमोल गजानन शिंदे (२९, रा. आंत्री कोळी ता. चिखली) मारहाणीत जखमी झाला आहे. अमोलने काल देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. तो औरंगाबादला वाळूज येथील केशरदीप इंडस्ट्रीजमध्ये आॅपरेटर …
 
घरी परतताना वाटमारी… मारहाण करत नवीच मोटारसायकल लांबवली!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलस्वाराला काठीने मारहाण करून दुचाकी लांबवल्याची घटना देऊळगाव राजा- चिखली रोडवरील असोला फाट्याजवळ २४ जुलैच्‍या रात्री आठच्‍या सुमारास घडली. अमोल गजानन शिंदे (२९, रा. आंत्री कोळी ता. चिखली) मारहाणीत जखमी झाला आहे.

अमोलने काल देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. तो औरंगाबादला वाळूज येथील केशरदीप इंडस्ट्रीजमध्ये आॅपरेटर म्हणून काम करतो. तो औरंगाबादला वाळूज एमआयडीसीत राहतो. २२ दिवसांपूर्वी त्‍याने हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चिखलीच्‍या कोठारी शोरूममधून विकत घेतली होती. तो याच मोटारसायकलने २४ जुलैला दुपारी साडेचारच्‍या सुमारास रविवारची सुटी असल्यामुळे आंत्री कोळी येथे येत होता. असोला फाट्याच्या अलीकडे पावणेआठच्‍या सुमारास त्‍याला मागून डबलसीट येणाऱ्या मोटारसायकलस्वारांनी कट मारला. त्‍यामुळे अमोलने त्‍यांना गाडी व्यवस्‍थित चालवा असे सांगितले. तेव्हा ते थांबले व त्यांच्या मोटारसायकलवरून उतरले. त्‍यांना अमोल म्‍हणाला, की रस्ता खराब आहे. आरामात गाडी चालवा, असे सांगून तो मोटारसायकल घेऊन पुढे निघाला.

खार्डे पेट्रोलपंपाच्या अंदाजे एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर सिमेंट रोडने जाताना कट मारलेल्‍या मोटारसायकलवरील दोघे परत मागे लागले. त्‍यातील एकाने हातातील काठी अमोलच्‍या कपाळावर मारली. त्यामुळे अमोल पडला. त्‍याच्‍या हातापायाला मार लागला. आणखी मारहाण करतील म्हणून त्‍याने घाबरून तिथून पळ काढला. लांब जाऊन त्‍याने पाहिले असता मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने अमोलची विनानंबरची मोटारसायकल घेऊन गेला तर दुसरा व्‍यक्‍ती स्वतःची मोटारसायकल घेऊन निघून गेला. अमोलने वडिलांना फोन घटनेची माहिती दिली. त्‍यानंतर बापलेकांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. घुगे करत आहेत.