किनगाव राजाचे ठाणेदार, कर्मचारी थोडक्‍यात बचावले… खटारा जीप जाम होऊन खड्ड्यात जाऊन उलटली; ठाणेदारांसह कर्मचारी जखमी

किनगाव राजा (नीलेश डिघाेळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलिसांच्या खटारा वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, काल, 15 मे रोजी ठाणेदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव सुदैवाने वाचला. किनगाव राजाचे (ता. सिंदखेड राजा) ठाणेदार सोमनाथ पवार आणि सोबतचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना रात्री नऊच्या सुमारास पोलीस जीपचे स्टेअरिंग अचानक जाम होऊन गाडी एकीकडे खेचली जाऊ …
 

किनगाव राजा (नीलेश डिघाेळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोलिसांच्‍या खटारा वाहनांचा प्रश्न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला असून, काल, 15 मे रोजी ठाणेदारांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव सुदैवाने वाचला. किनगाव राजाचे (ता. सिंदखेड राजा) ठाणेदार सोमनाथ पवार आणि सोबतचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना रात्री नऊच्‍या सुमारास पोलीस जीपचे स्‍टेअरिंग अचानक जाम होऊन गाडी एकीकडे खेचली जाऊ लागली. त्‍याही परिस्‍थिती प्रसंगावधान राखून चालकाने वाहनाचा वेग नियंत्रित केला. मात्र तरीही गाडी रस्‍त्‍याखाली जाऊन आठ-दहा फूट खड्ड्यात कोसळली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, वारंवार नादुरुस्‍त होणाऱ्या या गाडीमुळे पोलिसांच्‍या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

झाले असे, की पोलीस ठाण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर सोनशी ते वर्दडी या मार्गावरून जाताना पोलिसांचे वाहन (क्र. एमएच २८ सी ६४७३) अचानक जाम होऊन स्‍टेअरिंग एका बाजूला खेचू लागले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या आठ ते दहा फूट खड्ड्यात वाहन जाऊन उलटले. त्यानंतर ठाणेदार सोमनाथ पवार गाडीचा दरवाजा पायाने उघडून बाहेर आले. मात्र सोबतचे कर्मचारी गाडीतच अडकलेले होते. त्यांना बाहेर येणे शक्य नव्हते. त्‍यामुळे ठाणेदारांनी स्वतः जखमी असून सुद्धा सहकाऱ्यांना गाडीच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना किनगाव राजा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. ठाणेदार श्री. पवार, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सानप, श्रावण डोंगरे, चालक गजानन साळवे या अपघातात जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अपघातग्रस्‍त वाहन कधीही जीव घेऊ शकते…

किनगाव राजा पोलिसांच्या वाहनाची अगोदरपासूनच दुरवस्था झालेली आहे. ते जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त किलोमीटर आजवर चालले आहे. असे असूनही पोलीस ठाण्याला नवीन वाहने देण्यात आलेले नाही. हे वाहन वेळोवेळी नादुरुस्त होत असते. त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन पोलीस स्टेशनला नवीन गाडी देण्याची मागणी होत आहे. आधुनिक पोलिसिंगसाठी आग्रही सारेच असतात. त्यासाठी पोलीस विभागाकडून नियोजन सुद्धा केले जाते. परंतु वास्तविकता वेगळी आहे. या वाहनाची दुरुस्‍ती अनेकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून केलेली आहे. वरिष्ठांना वेळोवेळी नादुरुस्त वाहनाच्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. मात्र तरीसुद्धा वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघातामध्ये जीवित हानी झाली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा प्रश्न  उपस्थित होत आहे. या अपघातानंतर आता पोलिसांना खासगी वाहनाचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.