एलसीबीची आता रेतीमाफियांवर वक्रदृष्टी!; चिखली तालुक्‍यात 15 लाखांची धडाकेबाज कारवाई

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या दोन तासांत रेती तस्करी करणारी दोन वाहने पकडून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 15 लाख रुपयांची कारवाई काल, 26 जूनला चिखली तालुक्यातील मलगी फाटा आणि चिखलीजवळील चिखली अर्बन सीबीएसई स्कूलच्या फाट्याजवळ केली. दोन वाहने जप्त करण्यात आली असून, दोन ब्रास रेती या वाहनांत आढळली आहे. दत्ता पंजाबराव सोळंके (22), …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या दोन तासांत रेती तस्‍करी करणारी दोन वाहने पकडून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने तब्‍बल 15 लाख रुपयांची कारवाई काल, 26 जूनला चिखली तालुक्‍यातील मलगी फाटा आणि चिखलीजवळील चिखली अर्बन सीबीएसई स्कूलच्या फाट्याजवळ केली. दोन वाहने जप्‍त करण्यात आली असून, दोन ब्रास रेती या वाहनांत आढळली आहे.

दत्ता पंजाबराव सोळंके (22), दत्ता दिनकर सोळंके (34, दोघे रा. चांधई, ता. चिखली) या दोघांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत रामराव जिंदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पोकाँ वैभव श्रीकृष्ण मगर, चालक सहायक फौजदार संजय मिसाळ हे काल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या आदेशानुसार, एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांच्‍या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. चिखली येथील मेहकर फाट्याजवळ ते आले असता गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, आताच मेहकर फाट्यावरून चोरीची रेती असलेली टाटा 407 गाडी मलगीच्या दिशने गेली आहे. या माहितीवरून पोलिसांनी लगेच मलगीच्या दिशेने धाव घेतली. मलगी फाट्याजवळ हे वाहन दिसून आले. चालकाला त्‍याचे नाव विचारून रेतीच्‍या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र चालक दत्ताने परवाना नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे वाहनासह त्‍याला ताब्‍यात घेण्यात आले. वाहनात 1 ब्रास रेती होती. त्‍याने ती खडकपूर्णा नदीतून आणल्याचे सांगितले.

ही कारवाई करून चिखली येथील जाफराबाद फाट्यावर हे पथक आले असता गोपनीय बातमीदाराने आणखी एक माहिती दिली की आताच जाफराबाद येथून चोरीची रेती असलेली दुसरी टाटा 407 गाडी चिखलीच्या दिशेने येत आहे. या माहितीवरून चिखली येथून जाफराबादच्या दिशेने अंदाजे 2 कि.मी. अंतरावर चिखली अर्बन सीबीएसई स्कूलच्या फाट्याजवळ हे वाहन पकडण्यात आले. चालक दत्ता दिनकर सोळंके यानेही रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. या वाहनातही 1 ब्रास रेती आढळली. या दोन्‍ही कारवायांत साडेसात लाखांचे एकेक वाहन आणि त्‍यातील 10 हजारांची एकेक ब्रास रेती असा एकूण 15 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.