आज 732 पॉझिटिव्ह! बुलडाण्यातील स्फोट कायम, दिडशेचा टप्पा गाठला, खामगाव पुन्हा शतकविर!! लोणारमध्ये उद्रेक
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल जिल्ह्यात 885 रुग्णांसह कोरोनाने नवीन विक्रम केला होता. या तुलनेत आज, 19 मार्चला 732 पॉझिटिव्ह येणे म्हणजे घट होणे (!) हाच काय तो दिलासा ठरलाय! जिल्ह्याला यापेक्षा जास्त किंवा भरीव दिलासा द्यायला कोरोना ऊर्फ कोविड तूर्तास तरी तयार नाय!
गत् 24 तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 730 चा आकडा पार केला. यात आघाडीवरील बुलडाणा तालुक्याचे योगदान तब्बल 150 तर खामगावचे 105 इतके आहे. म्हणजे हे दोन्ही तालुके मिळूनच पॉझिटिव्ह संख्या 255 इतकी येते. यात शतक हुकलेल्या चिखलीचा ( 97 रुग्ण), शेगाव (79) मलकापूर (46) या आघाडीवरील तालुक्यांचा महत्वाचा वाटा आहेच! मात्र मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या मेहकर 66 रुग्ण व लोणार तालुक्यात कोरोनाने पुन्हा मुसंडी मारीत आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी पुन्हा वाढविली. मोताळा तालुक्याने देखील अर्धशतक (51 रुग्ण) गाठल्याने यात भरच पडली असे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा चौफेर विस्तार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला आव्हान देणारा ठरत आहे.
क्षणिक दिलासे…
दरम्यान सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोविडने शेगाव तालुक्यात काहीशी विश्रांती घेतली असून, गत 24 तासांत 20 रुग्णच आढळले. काल स्फोट झालेल्या सिंदखेडराजात आज 22, नांदुऱ्यात 13, जळगाव जामोदमध्ये 20 तर संग्रामपूरमध्ये 14 रुग्ण आढळले. मात्र हा दिलासा किती तास टिकतो याचे उत्तर ‘कोविड कुमार’ वा उद्याच्या अहवाल यांनाच ठाऊक! कोविडने तर छळ करण्याचा चंग बांधलाय, मग अहवाल तर एक औपचारिकताच आहे.