CRIME NEWS लग्नाला आलेल्या मुलाची "ती" सवय बापाच्या मस्तकात गेली! वैतागलेल्या बापाने केले मुलाचे डझनभर तुकडे; पोत्यात भरून तलावात फेकले
Aug 4, 2023, 18:04 IST
मिरज (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): रागाच्या भरात कधी काय होईल याचा नेम नाही. रागाच्या भरात अनेकदा जवळच्या जवळच्या व्यक्तीला संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संपत्तीच्या वादातून किंवा इतर कारणांनी मुलाने बापाला यमसदनी धाडल्याच्या घटनाही महाराष्ट्राने बघितल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्र हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. एका बापानेच आपल्या मुलाचा निर्दयी खून केला. केवळ खून करून बाप थांबला नाही तर मुलाच्या मृतदेहाचे डझनभर तुकडे केले. पोत्यात भरले आणि एका तलावात फेकून दिले.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज मधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजेंद्र हंडीफोड (५०) असे निर्दयी बापाचे नाव आहे. रोहित हंडीफोड (२५) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. हंडीफोड कुटुंब मिरज शहरातील गणेश तलाव लक्ष्मी मंदिराजवळ राहते.
प्राप्त माहितीनुसार रोहित याला जुगार खेळायची सवय लागली होती. जुगारातून तो व्यसनाच्या आहारी गेला होता. व्यसनाची तलफ पूर्ण करण्याची तो घरच्यांना त्रास देऊ लागला.
घरात त्यासाठी रोज कटकट होऊ लागली. लग्नाच्या वयात मुलाला लागलेल्या या वाईट सवयीला त्याचा बाप वैतागला होता.अखेर वैतागलेल्या बापाने मुलाचा कायमचाच काटा काढला.
रोहितच्या वडिलांनी त्याचा कुऱ्हाडीने खून केला. एवढे झाल्यावरही संतापाची आग मस्तकात गेलेल्या त्या बापाने कटरने मुलाच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे पोत्यात भरून तलावात फेकून दिले आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकारामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. रोहितच्या बापाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता. तलावात रोहितच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे.