आज 308 पॉझिटिव्ह!; बुलडाणा, चिखलीमधील तांडव कायम, मलकापुरात वाढले रुग्ण!!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः मागील 4 दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हच्या तुलनेत आज, 25 फेब्रुवारीच्या सकाळी रुग्णसंख्येत घट झाल्याचे सुखद चित्र आहे. कालपरवा आकडा 400 च्या पल्याड गेल्याने आज आलेला 308 चा आकडा कमी वाटणे स्वाभाविक ठरले..!
काल संकलित नमुन्यांची संख्या लक्षणीय ठरली. आरटीपीसीआर व रॅपिड मिळून तब्बल 3562 स्वॅब नमुने जमा करण्यात आले. यातील 2753 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 308 बाधित आले. मागील आठवड्यापासून आघाडीवर असलेल्या बुलडाणा ( आज 55 रुग्ण) व चिखली ( 60 ) , खामगाव (49) या तालुक्यांतील आकडे अजूनही धोकादायक या विशेषणाला शोभणारेच आहे! या पंक्तीत आता मलकापूर तालुका सरसावला असून, तालुक्यात तब्बल 46 रुग्ण आढळलेत. देऊळगावराजा तालुकाही मागे नसून रुग्ण संख्या 39 इतकी आहे. या तुलनेत जळगाव 13, मोताळा 9, सिंदखेड राजा 15, मेहकर 10, नांदुरा 1, लोणार तालुक्यातील आकडा नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. एकूण आकडा घसरल्याने पॉझिटिव्ह होण्याचा दर 11.18 टक्के इतका कमी झाला आहे. आजची ही घट, टक्केवारी दिलासा देणारी असली तरी उद्याच काय? या प्रश्नाचे उत्तर उद्याच्या अहवालातच दडलेले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांची धाकधूक कायम असून त्यात कोणतीही घट झाली नसल्याचे चित्र आहे.