चिंताजनक..! जिल्ह्यातील निम्‍मे कैदी १८ ते ३० च्‍या वयोगटातील!!

चोऱ्यांपासून खून, बलात्‍काराचे गुन्‍हे, कमी वयात गुन्‍हेगारी वृत्ती फोफावतेय..!
 
 
jail

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संस्कारात कमी पडणाऱ्या पालकांना त्‍यांची मुले पुढे कोणत्या वळणावर जातील, याचा इशारा देणारी ही बातमी आहे. कमी वयात गुन्‍हेगारी वृत्ती तरुणाईत फोफावत चालली असून, जिल्ह्याच्या जेलमध्ये बंदिस्त असलेले निम्‍मे कैदी १८ ते ३० वयोगटातील असल्याचे धक्कादायक वास्तव बुलडाणा लाइव्हच्या पाहणीत समोर आले आहे. बुलडाणा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता १०१ असली तरी क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. सध्या इथे २७९ कैदी आहेत. यापैकी तब्‍बल १४९ कैदी हे १८ते ३० या वयोगटातील आहेत.

अट्टल गुन्हेगारांचे वय कमी होत चालल्याचे हे भयानक चित्र आहे. चोऱ्या, घरफोड्या, विनयभंग, मारहाण, लैंगिक अत्याचार, खून या प्रकरणांत तरुणांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसते. झटपट श्रीमंत होण्याची लालसा तसेच वाईट मार्गाला लावणारा मित्रपरिवार यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. जिल्ह्यात रोजगाराच्या अत्यल्प संधी त्यामुळे आर्थिक विवंचनेतून तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसते. काही जण मुळातल्या दृष्ट प्रवृत्तीमुळे तर काही जण परिस्थितीमुळे गुन्ह्यात अडकले असतात. सर्वांत मोठे कारण तर चिंताजनक आहे. आई-वडिलांनी अतिप्रमाणात दिलेली मोकळीक मुलांना गुन्‍हेगारी वृत्तीकडे वळण्यास कारणीभूत ठरली आहे. आपला मुलगा-मुलगी काय करतात. त्याचा मित्रपरिवार कसा व कोणता आहे हे तपासण्याची जबादारी आई- वडिलाची असते. मुलांना जगण्याचे स्वातंत्र्य देताना ते इतके दिले जाते की त्‍याची पावले काळकोठडीकडे कधी वळली याचा थांगपत्ताही त्‍यांना नसतो. याची काळजी मुलांच्या आई-वडिलांनी घेतली पाहिजे.

आकर्षणाचे वाईट परिणाम
सध्याच्या तांत्रिकीकरणाच्या  काळात प्रत्येक तरुणाला आभासी जीवनाचे एक वेगळे आकर्षण आहे. महागडे मोबाईल मिळवण्यासाठी, गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी तरुण घरफोड्या, चोऱ्या करतात. आर्थिक दृष्ट्या आवाक्यात नसलेल्या लाईफस्टाईलचा मोह झाल्याने ती जगण्यासाठी तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समोर आले आहे.