बुलडाण्यात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण!

कार्यकर्त्याच्या आत्‍मदहनाच्या प्रयत्‍नानंतर शेतकऱ्यांनी चिखली रोड रोखला, संतप्त शेतकऱ्यांची पोलीस व्हॅनवर दगडफेक!!
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन, कापूस उत्‍पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्‍नत्‍याग सत्‍याग्रहाला आज, १९ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बुलडाण्यात हिंसक वळण लागले. जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. त्‍याला वेळीच रोखल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी चिखली रोड रोखून धरला. यावेळी  पोलीस आणि शेतकऱ्यांत राडा झाला. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून वाहन फोडले. ही धुमश्चक्री सुरू असताना मंडपात असलेले रविकांत तुपकर अन्‍नत्‍यागामुळे तब्‍येत बरी नसतानाही रस्त्यावर धावले. त्‍यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करत, ही लढाई पोलिसांशी नाही तर सरकारशी असल्याचे सांगितले. पोलिसांनाही लाठीमार व धरपकड न करण्याचे आवाहन केले. त्‍यामुळे वातावरण थोडक्‍यात आवरले गेले. सध्या आंदोलनस्‍थळी तणावपूर्ण शांतता आहे.

ेज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आरपारची लढाई सुरू केली असून, नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्‍नत्याग आंदोलनामुळे जिल्ह्यात वातावरण तणावग्रस्त झाले आहे. आधी नागपुरात तुपकरांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र नागपूर पोलिसांना त्‍यांना अटक करून बुलडाण्यात आले. कालपासून बुलडाण्यात आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपासून उपाशी असल्याने तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माझ्या भूमिकेवर ठाम असून, पोटात अन्‍नाचा कण जाणार नाहीच. मेल्याने जर शेतकऱ्यांना न्याय मिळणार असेल तर इथेच प्राण सोडेल, असा निर्धार तुपकरांनी व्यक्‍त केला आहे. एकीकडे तुपकरांची प्रकृती खालवत असताना, गावागावात सरकारविरोधात रोष निर्माण झाला असताना दुसरीकडे प्रशासन मात्र आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्‍याचाच परिणाम म्‍हणून मोताळा येथील शेख रफीक या कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळून घेण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना रोखण्यात आले. मात्र शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्‍यांनी चिखली रोडवर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्‍यामुळे शेतकरी आणि पोलिसांत राडा झाला.

जिज

दगडफेक करून पोलीस वाहन फोडण्यात आल्याने मोठा फौजफादा आंदोलनस्‍थळी पाचारण करण्यात आला. आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री सुरू असल्याचे कळताच मंडपातून तुपकर उठण्याची अवस्‍था नसताही त्‍यांच्याकडे धावले. शेतकरी, कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. आपली लढाई पोलिसांच्या विरोधात नाही. सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आहे. त्‍यामुळे शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन त्‍यांनी केले. शेतकरी, कार्यकर्त्यांची धरपकड न करण्याचे व लाठीमार न करण्याची विनंती त्‍यांनी पोलिसांनाही केली. त्‍यामुळे धुमश्चक्री थांबली असून, आंदोलनस्‍थळी तणावपूर्ण शांतता आहे. दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी तुपकरांच्या घरासमोर ठिय्या मांडला आहे, तर तितक्याच किंबहुना त्‍याहून अधिक पोलिसांनी तुपकरांच्या घराला वेढा दिल्यागत चित्र आहे. दरम्‍यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने आंदोलनस्थळी धावले. यात अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस सचिन कदम, गृहविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, शिरिष ताठोड, ठाणेदार प्रदीप साळुंखे यांचा समावेश होता. श्री. बनसोडे यांच्याशी रविकांत तुपकर यांनी चर्चा केली. आमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅन फोडली नाही. बाहेरचे कोणीतरी लोक होते, असा दावा त्‍यांनी केला. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीच हालचाल करत नसल्याने तुपकरांनी संताप व्यक्‍त केला. आत्‍मदहनाचा प्रयत्‍न करणाऱ्या कार्यकर्त्याला नेण्यासाठी आलेली रुग्‍णवाहिकेवरही दगडफेक झाल्याचे यावेळी प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.