...तर जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद!

कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या राज्‍याच्‍या बाबतीत निर्णय होण्याची शक्‍यता; जिल्ह्यात आज ९ बाधितांची भर
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णसंख्या पुन्‍हा वाढू लागली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही तीनच दिवसांत २० रुग्ण वाढले आहेत. त्‍यामुळे प्रशासन धास्तावले असून, मुंबई, पुण्यात जशा पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तसाच निर्णय बुलडाणा जिल्ह्याच्या बाबतीतही होण्याची शक्‍यता आहे. केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर राज्‍याच्‍या बाबतीत तसा निर्णय होऊ शकते, असे उच्‍चस्‍तरीय सूत्रांकडून समजते. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थी आणि साडेसतरा हजार शिक्षक पुन्‍हा एकदा ऑनलाइनचे पाढे गिरवताना दिसतील.

दीड महिन्यापासून शाळा सुरू झाल्या असून, यामुळे पालक, विद्यार्थी आणि काहीसे तणावाखाली असले शिक्षकही सुखावले होते. मात्र आता ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने शाळा बंद होण्याची भीती या वर्गाला जाणवू लागली आहे. जिल्ह्यात २४८५ पैकी २४१४ शाळा सुरू आहेत.

निवासी शाळा, आश्रम शाळा आणि होस्टेल्सला अजून परवानगी देण्यात आली नसल्याने ७१ शाळा बंद आहेत. जिल्ह्यात सध्या पहिले ते १२ वीचे ५ लाख, १४ हजार ३४२ विद्यार्थी रोज शाळेत हजेरी लावत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आता १५ वर्षांवरील म्हणजेच नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांना व त्यापुढील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १७ हजार ७२४ शिक्षकांपैकी ९८ टक्के शिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. २ टक्के शिक्षक लसीचा दुसरा डोस घेत आहेत. १५ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारी सुद्धा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी दिली.

९ रुग्णांची भर
जिल्ह्यात आज, ५ डिसेंबरला सकाळी हाती असलेल्या वृत्तानुसार, ९ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. त्‍यामुळे तीनच दिवसांत बाधितांचा आकडा २० वर गेला आहे. आज बुलडाणा शहरात ४, शेगावमध्ये ३, नांदुरा व मेहकरमध्ये प्रत्‍येकी १ रुग्ण आढळला आहे. त्‍यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.