खामगावच्या उद्योजकाला गंडवणाऱ्या भामट्याला पंढरपुरातून उचलून आणले!; खामगाव शहर पोलिसांची कामगिरी

 
खामगाव शहर पोलीस ठाणे
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या व्यावसायिकाला पोह्याच्या कंपनीत भागीदारीचे आमिष दाखवून साडेतेरा लाख रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार ऑक्टोबरमध्ये समोर आला होता. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ६ ऑक्‍टोबर २०२१ रोजी तक्रार देण्यात आली होती. त्‍यावरून अविनाश पांडुरंग अनपट (रा. मारापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने अविनाशला सोलापूर जिल्ह्यात जाऊन पंढरपूरमधून मोबाइल लोकेशनच्या आधारे अटक करून आणले.

खामगावचे व्यावसायिक विवेक कुळकर्णी यांची अविनाशसोबत २०१८ मध्ये फेसबुकवर मराठा युवा उद्योजक या ग्रुपवर ओळख झाली होती. पोहे उत्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये लोन पाहिजे किंवा गुंतवणूक केल्यास कंपनीत पार्टनरशिप मिळेल अशी पोस्ट अनपटने लिहिली होती. पोस्ट वाचून कुळकर्णींनी कंपनीत भागीदार होण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. महिन्याला ४ लाख रुपयांचे उत्पन्‍न येईल, अशी हमी अविनाशने कुळकर्णींना दिली होती.

कंपनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्‍याने कुळकर्णींकडून २०१९ मध्ये साडेतेरा लाख रुपये घेतले. उत्पन्‍नाबद्दल विचारणा केल्यानंतर त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ सुरू केली. कुळकर्णींना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ६ ऑक्टोबरला खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अविनाशचा शोध सुरू केला होता.

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे, पोहेकाँ विनोद शेळके, युवराज शेळके यांनी अविनाशला सोलापूर जिल्ह्यात जाऊन पंढरपुरात ताब्‍यात घेतले.