केळवद फाट्यावर पोलिसांनी आडोशाला उभ राहून....
Updated: Dec 23, 2023, 15:39 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील केळवद गावात अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू होती. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काल २२ डिसेंबरच्या दुपारी छापा टाकला. देशी दारूची सर्रास विक्री करणाऱ्या केळवद येथील संतोष वसंता पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात👆
प्राप्त माहितीनुसार छापा मारण्यासाठी पोलीस रवाना झाले होते. केळवद बसस्थानक परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री होत असल्याची कुणकुण पोलिसांना लागूनच होती. दरम्यान रंगेहात पकडण्यासाठी पोलीस आडोशाला जाऊन उभे राहिले. काही वेळानंतर खात्री झाली अन् पोलिसांनी संतोष पवारची झडती घेतली. त्यावेळी संतोष पवार केळवद येथीलच रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याहाती एक पिशवी आणि पांढरी पोतडी होती. त्यामध्ये तब्बल १८ देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.
इतकंच नाही तर पोलिसांनी परवाना विषयी विचारणा केल्यावर त्यांनी कोणताही परवाना नसल्याची कबुली दिली. त्यामुळे विनापरवाना देशी दारूची विक्री केल्याने चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.