तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी भेटीला; अन्‍नत्याग सोडण्याची विनंती

तुपकरांनी माघारी धाडले!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्‍नत्याग आंदोलनामुळे जिल्ह्यातील वातावरण बिघडत चालले आहे. गावागावात प्रशासन, सरकारप्रती संताप दिसून येत आहे. आजच्या रास्ता रोको आंदोलनातून ही धग दिसून आली. तुपकरांची प्रकृती बिघडत चालल्याने शांततेने चाललेले आंदोलन कोणत्याही क्षणी गंभीर वळण घेण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दुपारी अडीचला तहसीलदार रुपेश खंडारे आणि जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी तुपकरांचे निवासस्थान गाठले. उपोषण सोडण्याची विनंती त्‍यांनी केली. मात्र तुपकरांनी त्यांची विनंती धुडकावून लावत माघारी पाठवले.

आज, १९ नोव्हेंबर रोजी सत्‍याग्रहाचा तिसरा दिवस आहे. १७ नोव्हेंबर रोजी त्यांनी नागपुरातील संविधान चौकात तुपकरांनी अन्‍नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना नागपूर पोलिसांनी अटक करून बुलडाण्यात आणून सोडले. बुलडाण्यात तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानासमोरच अन्‍नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. आंदोलन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपासून उपाशी असल्याने तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. गेल्या दोन दिवसांत प्रशासकीय स्तरावरून तुपकरांच्या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या संतापात भर पडत होती. त्‍यामुळे तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तुपकरांचे निवासस्थान गाठले. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार झाला असून, लवकरच मागण्यांवर तोडगा काढता येईल, असे तुपकरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पोटात अन्‍नाचा कण जाणार नाही म्हणजे नाहीच. मी मेल्याने जर शेतकऱ्यांना न्याय मिळणार असेल तर इथेच प्राण सोडेल. पण मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाहीच, असे तुपकरांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी यासंदर्भात बोलायला पाहिजे. पण ते का बोलत नाहीत हे कळत नाही. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निरोप द्या, असे म्हणत तुपकरांनी अधिकाऱ्यांना आल्यापावली परत पाठवले. दरम्यान, हाय बीपी आणि शुगर लो झाल्याने तुपकर यांची तब्येत प्रचंड बिघडली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरीही आक्रमक झाले आहेत.आजच्या रास्ता रोको आंदोलनानंतर उद्या, २० नोव्हेंबर रोजी गावबंद आंदोलनाची हाक तुपकर यांनी दिली आहे. तरीही सरकारने तोडगा काढला नाही तर २१ नोव्हेंबरपासून कायदा हातात घेण्यात येईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.