निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा बुलडाण्यात हार्टॲटॅकने मृत्‍यू!

आक्रमक आंदोलनकर्ते बसस्‍थानकातच करणार होते अंत्‍यसंस्कार, पण पोलिसांची शिष्टाई कामी आली!!
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिने उलटूनही सुरूच आहे. याचे परिणाम गंभीर स्वरुपात समोर असून, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही कडक भूमिका घेत अनेकांना आजवर निलंबित केले आहे. अशाच एका निलंबित केलेल्या बुलडाण्याच्या कर्मचाऱ्याला हार्टॲटॅक आला आणि यातच त्‍यांचे निधन झाले. त्‍यानंतर आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात जाऊन निलंबित करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, यासाठी आग्रह धरला. बसस्‍थानकात अंत्‍यविधी करण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. मात्र पोलिसांनी मध्यस्‍थी केली. त्‍यामुळे अंत्‍यसंस्कार स्मशानभूमीतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत अंत्‍यसंस्काराची तयारी सुरू होती.
बत
मृतक एसटी कर्मचारी.

सिद्धोधन टी. इंगळे (५४, रा. सुंदरखेड, बुलडाणा) असे निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बुलडाणा आगारात वाहक निरीक्षक होते. एसटी महामंडळाचे राज्‍य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. त्‍यात टप्प्या टप्प्याने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

इंगळे यांना ८ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. हजर राहिले नाही तर एकतर्फी चौकशी करून बडतर्फ करण्याचा इशाराही पत्रात देण्यात आला होता. त्‍यामुळे ते तणावाखाली असल्याचे कौटुंबिक सूत्रांकडून समजते. आज दुपारी चारच्या सुमारास त्‍यांना घरी असताना अस्वस्‍थ वाटू लागले. त्‍यामुळे कुटुंबियांनी त्‍याला जिल्हा रुग्णालयात तातडीने हलवले. मात्र उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.

या घटनेची माहिती आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना कळताच त्‍यांनी इंगळे यांच्या घरी धाव घेतली. तिथे त्‍यांना श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्कार बुलडाणा बसस्‍थानकात करण्याचे नियोजन केले. पोलीस ठाण्यातही कर्मचाऱ्यांनी जाऊन निलंबनाचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्‍यानंतर अंत्‍यसंस्कार स्मशानभूमीतच करण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.