ST कर्मचारी आंदोलन : जिल्ह्याचे साडेसहा कोटींचे उत्‍पन्‍न बुडाले!

, ७५ कर्मचारी झाले निलंबित, लाखो प्रवाशांची दैना सुरूच!
 
 
st
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः या बातमीचे शीर्षक म्हणजे भरकटून दिशाहीन झालेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बुलडाणा विभागाची कशी वाताहत झाली याचे भीषण चित्र हाेय!
प्रारंभी वेतनवाढ व अन्य पूरक मागण्या आणि नंतर आंदोलनाचे राजकीयकरण किंबहुना हे आंदोलन काहीसे हायजॅक झाल्यावर राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण करा या मागणीसाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. न्यायालय, राज्य शासन, अभ्यास समिती असा या आंदोलनाचा विस्तार आहे. यामुळे हे आंदोलन, वादळात दिशा हरवलेल्या जहाजासारखे झाले आहे. महामंडळाच्या बुलडाणा विभागाची यामुळे वाताहत झाली, दैना झाली. आधीच दीर्घकालीन लॉकडाऊन व कोरोनामुळे भयंकर तोट्यात असलेल्या बुलडाणा विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. कमीअधिक अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांचे बेहाल होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. लालपरीवर विश्वास ठेवून बिनधास्त प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची दाणादाण उडाली. त्यांना खासगी वाहनधारकांच्या राजरोस मनमानीला तोंड द्यावे लागले व लागत आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास दररोजचे ७ डेपोंच्या ४०० शेड्युलद्वारे रोज सरासरी ७०  ते ८० हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. दिवाळीसारख्या महिनाभर चालणाऱ्या मोठ्या सिजनमध्ये दैनिक इन्कम ५० लाखांच्या घरात जाते. ७ ते २० नोव्हेंबरदरम्यानचे १३ दिवस धरले तर हा आकडा ६ कोटी ५० लाखांच्या घरात जातो. यादरम्यान तब्बल ७५ कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलंय! एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आणि बरेच काही नुकसान झाले.