'महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटना नौटंकी करतात'

आ. संजय गायकवाडांचे वादग्रस्त विधान
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रोखठोक वक्तव्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एका वक्तव्यामुळे आता चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रातल्या काही संघटना नौटंकी आहेत. काही संघटना तोडपाणी करतात. मी कुणा एका शेतकरी संघटनेचे नाव घेत नाही, मात्र जगातील एकमेव शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांचा विजय झाल्याचे तुम्ही बघितले, असे वक्‍तव्‍य गायकवाड यांनी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. रविकांत तुपकर यांच्‍या आंदोलनाबद्दल ते म्‍हणाले, की समर्थन करेल पण त्‍यात नौटंकी नसेल तर...

केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द केले. याचा जल्लोष गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ फटाके फोडून केला. यावेळी त्‍यांनी वादाला तोंड फोडले आहे. नवी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाच्या निमित्ताने जगातली, देशातली सर्वात मोठी अभिनव शेतकरी संघटना आम्ही पाहिली. महाराष्ट्रातल्या नौटंकी संघटनांसारखी ती नाही, असे गायकवाड म्हणाले. त्‍यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकरी संघटनेचे नाव न घेतल्याने त्यांचा रोख कुणावर, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आ. गायकवाड म्हणाले, की दीड वर्षापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकारने लाठीचार्ज केला, गोळीबार केला मात्र तरीही शेतकरी मागे हटले नाहीत. या शेतकऱ्यांचे कौतुक करायला पाहिजे. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ते आंदोलन करत राहिले. यासाठी खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनेचे कौतुक केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वतःचा जीव अर्पण करण्याची तयारी दाखवणाऱ्या शेतकरी संघटनेचा यात विजय झाला आहे. अदानी, अंबानीच्या हितासाठी जे काही काळे कायदे सरकारने तयार केले होते ते कायदे मागे घेण्याची वेळ आज सरकारवर आली. शिवसेना सुरुवातीपासून या शेतकऱ्यांच्या पाठिशी होती. त्यामुळे शिवसेना जल्लोष करत आहे, असे गायकवाड म्हणाले.